Narendra Modi-Vladimir Putin : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अलीकडेच युक्रेनचा दौरा केला होता. त्या दौऱ्यात रशिया-युक्रेन (Russia-Ukraine) युद्धावर चर्चा झाली. विशेष म्हणजे, दौऱ्यावरुन पंतप्रधान मोदी युद्ध थांबवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. आता याबाबत एक महत्वाची अपडेट आली आहे. मंगळवारी(दि.27) पीएम मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन (Vladimir Putin) यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे.
पीएम मोदींनी सोशल मीडियाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही नेत्यांमध्ये रशिया आणि युक्रेनमधील युद्धाबाबत चर्चा झाली. भारत शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पीएम मोदींनी पुतीन यांना सांगितले. याशिवाय, विशेष धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठीच्या दिशेने काय पाउले टाकता येतील, यावरही चर्चा करण्यात आली. यावरुन असे दिसून येत आहे की, पीएम मोदी रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी पुढाकार घेत आहेत.
दरम्यान, यापूर्वी सोमवारी पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यात फोनवर चर्चा झाली होती. या संभाषणानंतर परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात पीएम मोदी आणि बायडेन यांनी बांग्लादेशातील सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केल्याचे म्हटले. मात्र व्हाईट हाऊसने जारी केलेल्या निवेदनात या मुद्द्यावर काहीही सांगण्यात आले नाही. व्हाईट हाऊसने जारी केलेल्या निवेदनात फक्त रशिया-युक्रेन युद्धाचा उल्लेख करण्यात आला होता.