नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित केले. यावेळी नरेंद्र मोदींनी अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली. मन की बातच्या सुरुवातीलाच नवरात्रोत्सव, छटपूजा, दसरा आणि दिवाळीच्या शुभेच्छा त्यांनी देशवासियांना दिल्या. तसेच, नरेंद्र मोदींनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
सणांचा खरा आनंद वंचित लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणून, त्यांच्या जीवनातील अंधार दूर करायचा आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, दिवाळीतील लक्ष्मी पूजेचा उल्लेख करत देशवासियांना 'भारत की लक्ष्मी' अभियान सुरु करण्याचे आवाहन त्यांनी केले. आपल्या संस्कृतीत मुलींना लक्ष्मी मानले जाते कारण मुली स्वत:सोबत समृद्धी घेऊन येतात. मुलींच्या सन्मानासाठी सोशल मीडियावर सेल्फी विथ डॉटरच्या पार्श्वभूमीवर 'भारत की लक्ष्मी' असे अभियान सुरु करण्याचे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, “दिवाळीत फटाके फोडताना त्याच्या इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्या. आनंद असावा, कुणाला दुःख होणार नाही, याची काळजी घ्या. या उत्सवाच्या काळात अनेक लोक सणांच्या आनंदापासून वंचित राहतात. यालाच दिव्याखाली अंधःकार म्हणतात. दिवाळीत काही घरं प्रकाशाने न्हाऊन निघतील, तर दुसरीकडे काही घरं अंधारात राहतील."
याचबरोबर, तरुणांना तंबाखू, ई-सिगारेटपासून लांब राहण्याचे आवाहन नरेंद्र मोदींनी केले आहे. ते म्हणाले, "तंबाखू सेवन आणि नशा हानीकारक आहे. त्यामुळे कर्करोग, ह्रदयविकार, होतात. अलीकडेच भारतात ई-सिगरेटवर बंदी घालण्यात आली आहे. त्यात निकोटीन युक्त पदार्थ गरम करून निकोटीनच सेवन केले जाते. ई-सिगारेटविषयी चुकीची माहिती देण्यात आली आहे. निकोटीनचा वास येऊ म्हणून सुंगधित पदार्थ मिश्रण केले जाते. यांच्या सेवनामुळे नुकसान होते. हे सगळ्यांनाच माहिती नाही. ही नशा कुटुंबांना उद्ध्वस्त करतेय. फीट इंडियाबरोबरच व्यसनापासून दूर राहावे लागेल."