पंतप्रधानांच्या सल्ल्याने काँग्रेस कार्यकर्त्याने भजे तळले आणि आयुष्य उजळले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2018 02:19 PM2018-06-20T14:19:00+5:302018-06-20T14:19:00+5:30
नारायणभाई सध्या 10 रुपयांमध्ये 100 ग्रॅम दालपकोडा विकतात. सकाळी 7 ते 11 या वेळेत ते 300 किलो दालवडा विकतात तर संध्याकाळीही तितकीच विक्री करतात.
Next
वडोदरा- भजी तळणं हा सुद्धा एक रोजगारच आहे या पंतप्रधानांच्या उद्गाराचा काँग्रेसने यथेच्छ समाचार घेतला आहे. माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांच्यापासून अनेक काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान व अर्थमंत्र्यांची खिल्ली उडवली असून रोजगारसंधी कमी झाल्याबद्दल टीका केली आहे. मात्र पंतप्रधानांच्या याच सल्ल्यामुळे एका काँग्रेस कार्यकर्त्याचे आयुष्य मात्र बदलून गेले आहे. वडोदऱ्याच्या या काँग्रेस कार्यकर्त्याच्या स्टॉलवरील भजी चांगल्याच प्रसिद्ध झाल्या आहेत.
PM Modi's pakoda-selling advice changed the life of Congress worker in Vadodarahttps://t.co/KXCiblI4xl
— Tajinder Pal Singh Bagga (@TajinderBagga) June 19, 2018
एनएसयुआयचे सदस्य नारायणभाई राजपूत हे काँग्रेसपक्षासाठी काम करतात. त्यांनी हिंदी साहित्यामध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली असून त्यांनी पंतप्रधानांच्या त्या प्रसिद्ध मुलाखतीनंतर भजीचा स्टॉल सुरु केला आहे. श्रीराम दालवडा सेंटर असे त्यांच्या दुकानाचे नाव आहे. आज वडोदरा शहरात 35 ठिकाणी त्यांनी व्यवसाय सुरु केला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी मुलाखतीमध्ये भजी तळण्याबद्दल ते प्रसिद्ध वक्तव्य केल्यानंतर भजीचा उद्योग सुरु करण्याचे आपल्या मनात आल्याचे नारायणभाई सांगतात. भजीमधून प्रतीदिन 200 रुपये मिळाले तरी चांगला रोजगार सुरु करता येईल असा विचार त्यांनी केला. म्हणून त्यांनी 10 किलो साहित्यावर हा रोजगार सुरु केला. आज त्यांना 500 ते 600 किलो साहित्य रोज लागते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार भजीचा व्यवसाय सुरु करुन आपलं आयुष्य बदललं असलं तरी नारायणभाई स्वतःला अजूनही सच्चा काँग्रेस सदस्य समजतात आणि आपण जन्मतःच काँग्रेसचा माणूस असल्याचे म्हणवतात.
त्यांनी आपल्या स्टॉलचे नाव श्रीराम ठेवण्यामागची कथाही सांगितली. जर दगड तरंगू शकतात (रामायणातील रामसेतूचे दगड), नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासारखे नेते देशाचे नेतृत्त्व करु शकतात तर श्रीरामांच्या नावाने भजीचा स्टॉलही चांगला चालेल असा आपण विचार केल्याचे ते सांगतात. नारायणभाई सध्या 10 रुपयांमध्ये 100 ग्रॅम दालपकोडा विकतात. सकाळी 7 ते 11 या वेळेत ते 300 किलो दालवडा विकतात तर संध्याकाळीही तितकीच विक्री करतात.