लखनौ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्या प्रकृतीबद्दल सोशल मीडियात अफवा पसरत आहेत. विशेष म्हणजे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी रात्री रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनवरुन त्यांच्या नातवाशी संपर्क साधत प्रकृतीबाबत विचारणा केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कल्याण सिंह यांनी ट्विटवरुन झालेल्या संवादासंदर्भात माहिती दिली आहे. कल्याणसिंह यांच्यासोबतच्या माझ्या अनेक आठवणी आहेत. त्यांच्याशी संवाद साधणे म्हणजे नवीन शिकणे होय, आज त्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. मी नुकतेच त्यांच्या नातवाशी फोनवरुन संवाद साधत कल्याणसिंह यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, असे मोदींनी म्हटले. तसेच, देशभरातून असंख्या प्रार्थना होत आहेत, असे म्हणत मोदींनीही त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.
कल्याण सिंह यांना काही दिवसांपूर्वी तब्येत बिघडल्यानंतर राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, गंभीर स्थिती लक्षात घेता त्यांना एसपीजीआय रुग्णालयात हलवण्यात आलं. इथे 'क्रिटिकल केअर मेडिसिन' विभागाच्या आयसीयूमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं. गुरुवारी रात्री उशिरा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी कल्याण सिंह यांची भेट घेऊन त्यांची प्रत्यक्ष विचारपूसही केली होती. कल्याण सिंह यांची भेट घेण्यासाठी नड्डा विमानतळाहून थेट एसजीपीजीआय रुग्णालयात दाखल झाले होते.
बाबरी विध्वंस घटनेवेळी होते मुख्ममंत्री
87 वर्षीय कल्याण सिंह हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. 6 डिसेंबर 1992मध्येही अयोध्येतील बाबरी पाडण्याच्या वेळी ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. या घटनेनंतर कल्याण सिंह सरकार बरखास्त करण्यात आलं होतं. 1999मध्ये त्यांनी भाजपा सोडून जनक्रांती पक्षाची स्थापना केली. परंतु कालांतरानं त्यांनी जनक्रांती पक्ष भाजपामध्ये विलीन केला. 2014मध्ये केंद्रात भाजपा सरकार आल्यानंतर कल्याण सिंह यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे पुत्र राजवीर सिंह एटा लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. कल्याण सिंह यांचे नातू संदीप सिंह उत्तर प्रदेशमधल्या योगी आदित्यनाथ सरकारमध्ये शिक्षा राज्यमंत्री आहेत.
राज्यपाल असताना भाजपाचे जाहीर कौतुक
राजस्थानचे राज्यपाल असताना कल्याण सिंह यांनी केलेल्या विधानावरून ते विरोधकांच्या टीकेचे धनी झाले होते. अलिगडमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कल्याण सिंह यांनी भाजपाला लोकसभा निवडणुकीत विजय मिळायला हवा, अशी इच्छा व्यक्त केली आहे. तसेच नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान झालेलं पाहायला आवडेल, असेही म्हटले होते. परंतु या विधानानंतर ते अडचणीत सापडले आहे. राज्यपाल हे एक संवैधानिक पद आहे. या पदावर विराजमान व्यक्तीनं कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू घेणं योग्य नाही.