अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबेन (वय ९९) आजारी पडल्याने त्यांना येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासाने सांगितले.
आजारी आईला भेटण्यासाठी मोदी दुपारी रुग्णालयात पोहोचले. अहमदाबादला पोहोचल्यानंतर ते रुग्णालयात गेले आणि तेथे तासभराहून अधिक काळ थांबले. भाजप खासदार जुगलजी ठाकोर यांनी सांगितले की, हिराबेन यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना एक-दोन दिवसांत डिस्चार्ज मिळू शकतो.
कठीण काळात तुमच्यासोबत : राहुल गांधी
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी आणि इतर पक्षांच्या अनेक नेत्यांनी बुधवारी मोदी यांच्या आईंना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. राहुल गांधी यांनी द्वीट केले की, “आई आणि मुलामधील प्रेम हे शाश्वत आणि अमूल्य आहे. मोदीजी, या कठीण काळात माझे प्रेम आणि पाठिंबा तुमच्यासोबत आहे. तुमच्या मातोश्री लवकर बऱ्या व्हाव्यात.”
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"