नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लोकसभेत बोलताना काँग्रेस आणि कोरोना काळातील विरोधकांकडून सातत्याने होत असलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान मोदी काँग्रेसवर निशाणा साधत असताना काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्यासह काँग्रेस सदस्यांनी गोंधळ आणि गदारोळ करण्यास सुरुवात केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी आज तो नेहरुजी ही नेहरुजी; मजा लिजिए, असा टोला लगावला.
एकीकडे कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे अगदी पेट्रोल डिझेलपासून ते सिलिंडर गॅसपर्यंत अनेक गोष्टींचे दर गगनाला भिडले आहेत. याच मुद्द्यावरून काँग्रेसने सातत्याने केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर हल्लाबोल केल्याचे दिसून आले. याला लोकसभेत उत्तर देताना अगदी देशाचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भाषणांचा सारांश देत महागाईचा दर भाजपच्या कार्यकाळात कसा कमी होता, याची आकडेवारीच दिली.
आम्ही पळून जाणारे लोक नाही, आमचे प्रयत्न प्रामाणिक
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज नेहरुंचे नाव घ्यावेच लागेल. किंबहुना ते मी घेणारच आहे. देशात महागाई वाढली होती, तेव्हा तत्कालीन सरकाने हात वर केले होते. महागाईवर सरकारचे नियंत्रण नव्हते. लाल किल्यावरून भाषण करताना नेहरुंनी, कोरियातील लढाईमुळे भारतात महागाई वाढते. ही बाब आमच्या नियंत्रणातील नाही, असे सांगितले होते. तसेच अमेरिकेतील घटनांमुळेही भारतातील महागाई वाढते, असे म्हटले होते. मात्र, आम्ही पळून जाणाऱ्यांपैकी किंवा हात वर करणाऱ्यांपैकी नाही. महागाई नियंत्रण तसेच स्थिरता येण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. तसेच सन २०१४ ते २०२० या कालावधीत महागाईचा दर हा ५ टक्क्यांपेक्षा कमी राहिला, असे पंतप्रधान मोदींनी नमूद केले.
काँग्रेसवाल्यांनी महागाईचा कांगावा केला
तत्कालीन माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम सध्या वर्तमानपत्रात अर्थव्यवस्थेवर लेख लिहित आहेत. पण सन २०१२ मध्ये ते म्हणाले की, पाण्याच्या बाटलीसाठी १५ रुपये आणि आईस्क्रीमसाठी २० रुपये खर्च करतात, तेव्हा जनतेला त्रास होत नाही. परंतु गहू आणि तांदूळाच्या किमती १ रुपयांनी वाढल्याने जनता सहन करू शकत नाही, असे म्हटले होते. यावरूनच काँग्रेसला सामान्य जनतेची पर्वा नाही. महागाईचा काँग्रेसने केवळ कांगावा केला, अशी टीकाही पंतप्रधान मोदी यांनी केली.