Pm Modi vs Congress: "तुम्ही आमच्यावर जितकी चिखलफेक कराल, तितक्या जास्त ठिकाणी कमळ उमलेल"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 03:07 PM2023-02-09T15:07:39+5:302023-02-09T15:08:38+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस व मल्लिकार्जुन खर्गेंवर निशाणा
Pm Modi vs Congress: संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आठव्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिल्यानंतर विरोधकांवर टिकास्त्र डागले. पीएम मोदी म्हणाले की काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेजी तक्रार करत होते की मोदीजी वारंवार माझ्या मतदारसंघात येतात. मी त्यांना सांगू इच्छितो की, मी पुन्हा पुन्हा तेथे येणारच, तुम्ही ते पाहिले असेलच. कारण तेथे १ कोटी ७० लाख जन धन बँक खाती उघडली गेली आहेत हे तुम्ही पाहायला हवे. एकट्या कलबुर्गीमध्ये ८ लाखांहून अधिक जन धन खाती उघडण्यात आली आहेत.
"मी काम करतोय हे पाहून विरोधकांना त्रास होतोय. मला मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वेदना समजत आहेत. तुम्ही दलितांबद्दल जर बोलत असाल तर, त्याच ठिकाणी निवडणुकीत दलितांना विजय मिळाला हेही तुम्ही पाहायला हवे. आता जनता तुम्हाला नाकारतेय म्हणून तुम्ही इथे तुमचे रडगाणे गात आहात. भारत हे संघराज्य आहे. गेल्या दशकामध्ये अनेक विचारवंतांनी घरी बसून देशाला दिशा दिली. असे लोकही घरात बसलेले असतात ज्यांनी आयुष्यात अनेक यश मिळवले आहे. सभागृहात जे घडते ते देश ऐकतो आणि गांभीर्याने घेतो. त्यामुळे तुम्ही आमच्यावर जितकी टीका किंवा चिखलफेक करायचा प्रयत्न कराल, तितक्या जास्त ठिकाणी (भाजपाचे) कमळ उमलेल", असा अतिशय खरपूस शब्दांत पंतप्रधान मोदींनी खर्गेंच्या टीकेचा समाचार घेतला.
दरम्यान, यावेळी हे अधिवेशन ज्या अदानींमुळे गाजले, त्या अदानीचे मोदींनी एकदाही नाव घेतले नाही. मोदींनी कालच्या राहुल गांधींच्या अदानींवरील भाषणाचा खरपूस समाचार घेतला. यावर राहुल यांनी प्रतिक्रिया दिली. "मोदींनी माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. मी कोणतेही कठीण प्रश्न विचारले नव्हते. अदानी तुमच्यासोबत किती वेळा परदेश दौऱ्यावर गेले, ते तिथे कितीवेळा भेटले, मला हे साधे प्रश्न पडले होते पण पंतप्रधान मोदींनी त्यांची उत्तरे दिली नाहीत", असे राहुल म्हणाले होते. पण या टीकेवर उत्तर देणे त्यांनी टाळलं.