PM Narendra Modi Mann Ki Baat: श्रीरामांचे रामराज्य भारतीय संविधानाच्या निर्मात्यांसाठी प्रेरणास्त्रोत होते. म्हणूनच २२ जानेवारीला अयोध्येत 'देव ते देश', 'राम ते राष्ट्र' या विषयावर बोललो. अयोध्येत रामलला प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने देशातील कोट्यवधी जनतेला एकाच सूत्रात बांधले. सर्वांच्या भावना सारख्याच आहेत, सर्वांची भक्ती सारखीच आहे, प्रत्येकाच्या बोलण्यात राम आहे, प्रत्येकाच्या हृदयात राम आहे. २२ जानेवारीच्या संध्याकाळी संपूर्ण देशाने रामज्योत लावून दिवाळी साजरी केली. या काळात, देशाने सामूहिकतेची शक्ती पाहिली, जो विकसित भारतासाठी आपल्या संकल्पांचा एक प्रमुख आधार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात केले. मन की बात या कार्यक्रमाचा १०९ वा भाग प्रसारित करण्यात आला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी विविध मुद्द्यांवर देशवासीयांशी संवाद साधला.
देशातील जनतेला मकर संक्रांती ते २२ जानेवारीपर्यंत स्वच्छता मोहीम राबवण्याचे आवाहन केले होते. लाखो लोक भक्तीभावाने सहभागी झाले. त्यांच्या परिसरातील धार्मिक स्थळांची स्वच्छता केली हे मला आवडले, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. तळागाळातील लोकांशी जोडून समाजात मोठे बदल घडवून आणण्याचे काम करणाऱ्या अनेक देशवासीयांना पद्म पुरस्कार देण्यात आले. या प्रेरणादायी लोकांच्या जीवन प्रवासाविषयी जाणून घेण्यासाठी देशभरात उत्सुकता निर्माण झाली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
२६ जानेवारीच्या परेडमध्ये महिला सशक्तीकरणाची सर्वाधिक चर्चा
२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाची परेड खूप छान होती. या परेडमधील महिला सशक्तीकरणाची सर्वांत जास्त चर्चा झाली, जेव्हा कर्तव्य पथावर केंद्रीय सुरक्षा दल आणि दिल्ली पोलिसांच्या महिला तुकडी पथसंचलन करू लागल्या, तेव्हा सगळ्यांना अभिमान वाटला. यावेळी परेडमधील २० पथकांपैकी ११ पथके केवळ महिलांची होती. राज्याच्या चित्ररथांमध्येही महिला कलाकारांची संख्या लक्षणीय होती. यानंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात सुमारे दीड हजार मुलींनी सहभाग नोंदवला. डीआरडीओच्या चित्ररथानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जल, जमीन, आकाश, सायबर आणि अवकाश या प्रत्येक क्षेत्रात महिला शक्ती देशाचे रक्षण कसे करत आहे हे यातून दिसून आले, असे पंतप्रधान मोदी यांनी आवर्जून सांगितले.
Women Led Development हा मंत्र घेऊन देश पुढे जात आहे
Women Led Development हा मंत्र घेऊन भारत पुढे जात आहे. अर्जुन पुरस्कार सोहळ्यात एका गोष्टीने लोकांचे लक्ष वेधले ते म्हणजे अर्जुन पुरस्कार प्राप्त महिला खेळाडू आणि त्यांचा जीवनप्रवास. यावेळी १३ महिला खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या महिला खेळाडूंनी अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन भारताचा झेंडा फडकवला. या धाडसी आणि प्रतिभावान खेळाडूंनी सर्व आव्हानांवर मात केली. बदलत्या भारतामध्ये महिला प्रत्येक क्षेत्रात आश्चर्यकारक कामगिरी करत आहेत. महिलांनी आपला ठसा उमटवलेले आणखी एक क्षेत्र म्हणजे महिला बचत गट. देशात महिला बचत गटांची संख्याही वाढली असून, त्यांच्या कार्याची व्याप्ती वाढली आहे. तो दिवस दूर नाही, नमो ड्रोन दीदी प्रत्येक गावातील शेतात ड्रोनच्या माध्यमातून मदत करताना दिसतील, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.
दरम्यान, तुमच्यासोबत भारताचे एक मोठे यश शेअर करत आहे, ज्यामुळे रुग्णांचे जीवन सोपे होईल. समस्या कमी होतील. सांगायला आनंद होत आहे की, आयुष मंत्रालयाने जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीने आयुर्वेद, सिद्ध आणि युनानी औषधांशी संबंधित डेटा आणि शब्दावलीचे वर्गीकरण केले आहे. या दोघांच्या प्रयत्नांमुळे आयुर्वेद, युनानी आणि सिद्ध वैद्यकातील आजार आणि उपचारांशी संबंधित शब्दावली संहिताबद्ध करण्यात आली आहे. या कोडिंगच्या मदतीने आता सर्व डॉक्टर त्यांच्या प्रिस्क्रिप्शनवर किंवा स्लिपवर एकच भाषा लिहू शकतील, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.