PM Modi Rally In Rewari: अयोध्येत भव्य राम मंदिर व्हावे अशी देशाची इच्छा होती. आता संपूर्ण देश रामललाला भव्य राम मंदिरात विराजमान झालेले पाहत आहे. ज्या काँग्रेसचे लोक प्रभू श्रीरामाला काल्पनिक म्हणायचे. ज्यांना कधीच राम मंदिर बांधायचे नव्हते, तेही आता जय सियाराम अशा घोषणा देत आहेत. काँग्रेसचे नेते एक एक करून पक्ष सोडत आहेत. अशी परिस्थिती आहे की, काँग्रेसकडे स्वतःचे कार्यकर्तेही उरलेले नाहीत. काँग्रेस जिथे सरकारमध्ये आहेत, तिथे त्यांचे सरकारवर अंकुशही ठेवता येत नाही, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. हरियाणा येथील रेवाडी येथे पंतप्रधान मोदी यांनी एका जनसभेला संबोधित केले.
सन २०१३ मध्ये जेव्हा भाजपाने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून माझे नाव घोषित केले, तेव्हा पहिला कार्यक्रम रेवाडी येथे झाला. रेवाडीने मला २७२ क्रॉसचा आशीर्वाद दिला. पुन्हा एकदा रेवाडीत आलो आहे, त्यामुळे एनडीए सरकारने ४०० चा आकडा पार करावा, असा आशीर्वाद जनतेने द्यावा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.
संयुक्त अरब अमिराती आणि कतारमधील सन्मान हा सर्व भारतीयांचा
संयुक्त अरब अमिराती आणि कतारमध्ये भारताला ज्या प्रकारे आदर मिळतो. भारताला प्रत्येक कानाकोपऱ्यातून शुभेच्छा मिळतात, तो आदर फक्त मोदींचा नाही, तो आदर भारतीयांचा आहे, तो तुम्हा सर्वांचा आहे. गेल्या १० वर्षात भारत ११ व्या क्रमांकावरून ५वी मोठी अर्थव्यवस्था बनला. हेही तुमच्या आशीर्वादाने घडले. आता तिसऱ्या कार्यकाळात भारताला येत्या काही वर्षांत जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनवण्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
दरम्यान, विकसित भारत बनवण्यासाठी हरियाणाचा विकास होणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा येथे आधुनिक रस्ते बांधले जातील तेव्हाच हरियाणाचा विकास होईल. आधुनिक रेल्वे नेटवर्क असेल तेव्हाच हरियाणाचा विकास होईल. हरियाणाचा विकास तेव्हाच होईल जेव्हा तेथे मोठी आणि चांगली रुग्णालये असतील. १० हजार कोटी रुपयांचे विकास प्रकल्प हरियाणाला सुपूर्द करण्याची संधी मिळाली. प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद असा आहे की, प्रत्येक ठिकाणी अशा पवित्र कार्याशी जोडण्याची संधी मिळते. ही रामजींची कृपा आहे, असे मोदी म्हणाले.