हैदराबाद : घराणेशाही पक्ष केवळ आपल्या कुटुंबाच्या कल्याणात गुंतले आहेत, परंतु भाजपला देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या कुटुंबाची काळजी आहे. आमचे संपूर्ण लक्ष लोकांना चांगले जीवन आणि संधी देण्यावर आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. रविवारी तेलंगणातील महबूबनगर येथे जाहीर सभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी राज्यातील के चंद्रशेखर राव (KCR) सरकारवर जोरदार निशाणा साधला.
जाहीर सभेला संबोधित करताना नरेंद्र मोदींनी सर्वप्रथम देशवासियांना 'स्वच्छता कार्यक्रमात' सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच, ते म्हणाले की, येथे येण्यापूर्वी आज सकाळी स्वच्छता अभियानाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. मी देशवासियांना आवाहन करतो की, स्वच्छता कार्यक्रमात सहभागी व्हा आणि या मोहिमेत सहभागी होण्यासाठी एक तास काढा.
याचबरोबर, अलिकडच्या वर्षांत तेलंगणातील जनतेने लोकसभा, विधानसभा आणि नागरी निवडणुकांमध्ये भाजपला बळ दिले आहे. आज येथे दिसणाऱ्या गर्दीतून मला विश्वास आहे की तेलंगणातील जनतेने परिवर्तनाचा संकल्प पक्का केला आहे. तेलंगणाला बदल हवा आहे, कारण राज्याला भ्रष्टाचाराची नव्हे तर पारदर्शक आणि प्रामाणिक सरकारची गरज आहे. तसेच, तेलंगणाला जमिनीवर काम करण्याची आणि भाजप सरकारची गरज आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
"शेतकऱ्यांना दिलं होतं खोटे आश्वासन"पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तेलंगणातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, राज्य सरकारने त्यांच्या समस्यांकडे कधीच लक्ष दिले नाही. खोट्या आश्वासनांमुळे अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. आमचे येथे सरकार नाही, तरीही आम्ही शेतकर्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. वर्षानुवर्षे बंद असलेला रामागुंडम खत प्रकल्प आम्ही पुन्हा सुरू केला. जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. तसेच, 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी' योजनेअंतर्गत तेलंगणातील शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 10,000 कोटी रुपये थेट जमा करण्यात आले, असेही नरेंद्र मोदींनी सांगितले.