कटक - केंद्रातील मोदी सरकारला आज चार वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त भाजपा आणि मोदी सरकारमधील मंत्री, सरकारनं केलेली काम- राबवलेल्या योजना यांसहीत अन्य गोष्टींचे रिपोर्ट कार्ड जनतेसमोर मांडण्यात व्यस्त आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ओडिशातील कटक येथे जनतेला संबोधित करताना त्यांनी आपल्या सरकारचे रिपोर्ट कार्ड सादर केले.
(राहुल गांधींनी मोदी सरकारला दिलं 'एफ' ग्रेड)
सरकारनं केलेल्या कामाचं कौतुक करत असताना दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला केला. सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही जनपथहून सरकार चालवत नाही. शिवाय काळा पैसा आणि भ्रष्टाचारविरोधात सुरू करण्यात आलेल्या मोहीमबाबत त्यांनी सांगितले की, आम्ही JAM म्हणजे जनधन, आधार आणि मोबाइलच्या माध्यामातून 80,000 कोटी रुपये चुकीच्या हातांमध्ये जाण्यापासून वाचवले.
मोदी पुढे असंही म्हणाले, देशात सध्या कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार आहे. त्यामुळेच देशात ‘सर्जिकल स्ट्राईक्स’ सारखे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. त्याचबरोबर ‘वन रँक वन पेन्शन’ सारखा अनेक दशकांपासून अडकलेला निर्णय लागू होतो.
दरम्यान, यावेळी मोदींनी जनतेला भावनिक साद घालण्याचाही प्रयत्न केला. ''तुमच्या इच्छा-आकांक्षा, स्वप्ने आणि आशाच मला काम करण्यासाठी प्रेरणा देत असतात, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. आमचे असे सरकार आहे ज्यांचा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान हे सर्वजण गरीबीतून पुढे आलेले आहेत. त्यामुळे मोदी सरकार हे गरीबांसाठीचे सरकार आहे. काँग्रेसला हे का कळले नाही की, यापूर्वी गरीबांना बँका दारातही उभ्या करीत नव्हत्या. गरीबांनाही काही मूल्ये आहेत, त्यांनाही जीवन विम्याची गरज असते हे काँग्रेसला आजवर का कळू शकले नाही? असा सवाल यावेळी मोदींनी विचारला.
शिवाय, आपला देश बदलू शकतो, असं गेल्या चार वर्षांत 125 कोटी भारतीयांना वाटते आहे. आज देश काळ्या पैशापासून ‘जनधन’कडे अर्थात वाईट सरकारकडून चांगल्या सरकारकडे वळला आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लोबाल चढवला.