नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या टप्प्यात जल संरक्षणाचं महत्त्व अधोरेखित केलं. सध्या देशाचा बहुतांश भाग जल संकटाचा सामना करत असल्यानं सर्वांनी जल संरक्षण करण्याची गरज असल्याचं आवाहन मोदींनी केलं. लोकांचा सहभाग आणि सहाय्य यांच्या मदतीनं जल संकटावर मात करू, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये पाणी टंचाईच्या समस्येनं गंभीर स्वरुप धारण केलं आहे. यावर मोदींनी 'मन की बात'मधून भाष्य केलं. पाण्याच्या संकटाचा सामना करण्यासाठी जलशक्ती मंत्रालयाची स्थापना करण्यात आली असून या माध्यमातून पाण्याच्या समस्येशी संबंधित निर्णय तातडीनं घेतले जातील, अशी माहिती त्यांनी दिली. 22 जूनला देशातील हजारो ग्रामपंचायतींनी जल संरक्षणाचा संकल्प केल्याचा संदर्भ देत पंतप्रधानांनी झारखंडच्या हजारी बागमधील एका सरपंचाचा संदेशदेखील ऐकवला. पंतप्रधानांनी मला पाण्याच्या संरक्षणासाठी पत्र लिहिलं, यावर माझा अद्यापही विश्वास बसत नसल्याचं या संदेशात संबंधित सरपंचानं म्हटलं होतं.पाण्याचं संरक्षण करण्याचा संकल्प केलेल्या सर्व सरपंचांना मोदींनी मन की बातमधून शुभेच्छा दिल्या. 'स्वच्छता आंदोलनाप्रमाणेच आता लोक गावागावात जलमंदिर तयार करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. जल संरक्षणाच्या प्रयोगांचा अभ्यास करुन त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. पाण्याच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्यांच्या कामाचं कौतुक होणं गरजेचं असून त्याबद्दलच्या माहितीची देवाणघेवाण व्हायला हवी,' असं मोदी म्हणाले. सोशल मीडियावर जनशक्ती फॉर जलशक्ती हा हॅशटॅग सुरू करावा, असं आवाहन त्यांनी केलं.