लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार आहे. यासाठी आज म्हणजेच गुरुवारी निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. पंजाबमधील होशियारपूरमध्येही सातव्या टप्प्यात मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा येथे घेतली. यावेळी जनतेला संबोधित करताना ते म्हणाले की, पंजाब ही आपल्या भारताची ओळख आहे, ती आपल्या गुरुंची पवित्र भूमी आहे. तसेच, अयोध्येत राम जन्मभूमीसाठी पहिली लढाई शिखांनीच लढवली होती, असे विधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
आज देशातील आकांक्षा नवीन आहेत, आज देशातील अपेक्षा नवीन आहेत, आज देशाचा आत्मविश्वास नवीन आहे. अनेक दशकांनंतर अशी वेळ आली असून, पूर्ण बहुमत असलेले केंद्र सरकार हॅट्ट्रिक करणार आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे 'विकसित भारत'चे स्वप्न आहे. आज प्रत्येक भारतीय 'विकसित भारत'चे स्वप्न घेऊन एकजूट झाला आहे आणि म्हणूनच प्रत्येक देशवासीय आपल्याला आशीर्वाद देत आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
जनता जनार्दनने मोदी सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकार हॅट्ट्रिक करणार आहे. २१ वे शतक हे भारताचे शतक असेल. एक मजबूत सरकार जे शत्रूचा पराभव करू शकते. तसेच, सरकारने रोडमॅप तयार केला आहे. पुढील ५ वर्षात कोणते मोठे निर्णय घेतले जाणार आहेत, हे सुद्धा निश्चित करण्यात आले आहे. १२५ दिवसांचा रोडमॅप तयार आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
याचबरोबर, स्वत: काशीचा खासदार असल्याचे सांगत जेव्हा जेव्हा तुम्ही काशीला याल तेव्हा तुम्ही माझे पाहुणे आहात आणि मी पाहुणचार करण्यात कोणतीही कसर सोडत नाही, असे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, मध्य प्रदेशातील रविदास मंदिराची पायाभरणी करण्याचे सौभाग्य मला मिळाले. आम्ही अयोध्येत रामाचे मंदिर बांधले आहे. राम मंदिर बांधले, पण तुमच्या सोयीसाठी महर्षी वाल्मिकी विमानतळ सुद्धा बांधले. त्याचप्रमाणे आदमपूर विमानतळालाही गुरु रविदासांचे नाव द्यावे, अशी माझी इच्छा आहे. सरकार स्थापन झाल्यावर याची अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिले.
या सभेत नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीवरही निशाणा साधला. इंडिआ आघाडीच्या स्वार्थी राजकारणामुळे देशाचे खूप नुकसान झाले. व्होट बँकेमुळे इंडिया आघाडी CAA ला विरोध करत आहे. व्होट बँकेसाठी ते राममंदिराला विरोध करत राहिले. विरोधकांना धर्माच्या आधारे आरक्षण द्यायचे आहे. आणीबाणीच्या काळात त्यांनी संविधानाचा गळा घोटला. १९८४ च्या दंगलीत शीख बांधवांना गळ्यात टायर बांधून जाळले जात होते, असे नरेंद्र मोदी म्हणाले.