नवी दिल्ली: माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावली असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. वाजपेयी यांच्या प्रकृतीबाबत एम्स रुग्णालयाकडून मेडिकल बुलेटिन जारी करण्यात आले असून, गेल्या 24 तासांमध्ये त्यांची प्रकृती अधिकच खाल्यावल्याचे सांगण्यात आले आहे. वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम्समध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. तसेच सुरेश प्रभू, स्मृती इराणी यांच्यासह इतर नेत्यांनीही एम्समध्ये जाऊन वाजपेयी यांच्या प्रकृतीचा माहिती घेतली. अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर 11 जून 2018 पासून एम्समध्ये उपचार सुरू आहेत. किडनीच्या आजारानं त्रस्त असलेल्या 93 वर्षांच्या वाजपेयींची प्रकृती गंभीर आहे. याशिवाय त्यांना स्मृतीभ्रंशही झाला आहे. वाजपेयी यांची प्रकृती खालावल्यानं नरेंद्र मोदी त्यांच्या भेटीसाठी एम्समध्ये पोहोचले आहेत. त्याआधी काही वेळापूर्वीच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी वाजपेयींची भेट घेतली होती.
वाजपेयींची प्रकृती चिंताजनक; पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेत्यांची एम्सकडे धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 8:15 PM