नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची घरी जाऊन भेट घेतली आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी सकाळी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची भेट घेऊन भाजपाच्या विजयाबद्दल त्यांचे आशीर्वाद घेतले.
नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या यशावर भाष्य करताना आज भाजपाने जे यश प्राप्त केले आहे त्यामागे अडवाणी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाच्या वाढीसाठी आपलं जीवन व्यतित केलं. लोकांमध्ये भाजपाचे विचार पसरविण्यासाठी अडवाणी आयुष्यभर झटले आहेत अशा शब्दात भावना व्यक्त केली.
तसेच डॉ. मुरली मनोहर जोशी यांचे योगदानही विसरता येणार नाही. देशातील शैक्षणिक वाट्यात मुरली मनोहर जोशी यांचे मोठं योगदान आहे. मुरली मनोहर जोशी यांनी पक्षासाठी जी मेहनत घेतली आहे ती कार्यकर्त्यांसाठी नेहमीच मार्गदर्शक राहील. आज सकाळी त्यांची भेट घेतली आणि आशीर्वादही घेतले असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.
मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी नरेंद्र मोदींना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. भाजपाला मागील निवडणुकीपेक्षा अधिक यश यंदाच्या निवडणुकीत मिळालं आहे. भाजपाप्रणित एनडीएला 543 पैकी 352 जागांवर यश मिळालं आहे. भाजपाला मिळालेलं हे ऐतिहासिक यश आहे अशी प्रतिक्रिया लालकृष्ण अडवाणी यांनी दिली आहे. तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांची मेहनत आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांचे नेतृत्व याचं यश असल्याचं अडवाणींनी सांगितले. तर मुरली मनोहर जोशी यांनी नरेंद्र मोदी यांना भाजपाच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गांधीनगर लोकसभेतून सहावेळा निवडून आलेले लालकृष्ण अडवाणी यांनी तिकीट नाकारत त्यांच्या मतदारसंघात अमित शहा यांना तिकीट देण्यात आलं. या मतदारसंघात पुन्हा एकदा मताधिक्य मिळवित भाजपाच्या अमित शहा यांना लोकांनी निवडून दिलं आहे. भाजपाला यंदाच्या निवडणुकीत स्वबळावर 303 जागा मिळाल्या आहेत तर काँग्रेसला 52 जागांवर समाधान मानावं लागलं आहे.