नवी दिल्ली : जी-७ परिषदेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इटलीला गेले होते. आता ते भारतात परतले आहेत. या जी-७ परिषदेत नरेंद्र मोदी यांनी इटलीतील अपुलिया येथे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. यावेळी जॉर्जिया मेलोनी यांनी नरेंद्र मोदी यांचे सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच, जी-७ परिषदेत सहभागी होण्याचे निमंत्रण स्वीकारल्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी दोन्ही नेत्यांनी उभय देशांमधील नियमित उच्चस्तरीय संवादाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
नरेंद्र मोदींच्या इटली दौऱ्यापूर्वीच सोशल मीडियावर सर्वाधिक उत्सुकता त्यांच्या आणि जॉर्जिया मेलोनी यांच्या भेटीबद्दल होती. दरम्यान, आता जी-७ परिषदेनंतर नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांचा एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये जॉर्जिया मेलोनी या नरेंद्र मोदींसोबत सेल्फी घेत आहेत. दोन्ही जागतिक नेते सेल्फी घेताना आरामात उभे आहेत आणि हसत आहेत. हा सेल्फी जी-७ परिषदेच्या बाहेरील असल्याचे दिसते. कारण, त्या सेल्फी घेताना मागे एक दरवाजा आहे आणि तिथे एक-दोन लोकही दिसत आहे. या सेल्फीमध्ये जॉर्जिया मिलोनी आणि नरेंद्र मोदी यांचा खास अंदाज पाहण्यासारखा आहे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपूर्वी संयुक्त अरब अमिरातीमध्ये 'वर्ल्ड क्लायमेट अॅक्शन समिट' (COP-28 समिट) आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदीही उपस्थित होते. त्यावेळी जॉर्जिया मेलोनी यांनी नरेंद्र मोदींसोबत सेल्फी घेतला होता. यानंतर जॉर्जिया मेलोनी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नरेंद्र मोदींसोबतचा सेल्फी शेअर केला होता. तसेच, हा फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये #Melodi हा हॅशटॅग वापरला होता. त्यावेळी हा सेल्फी सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आणि चर्चेचा विषय बनला होता.
दोन्ही नेत्यांमधील द्विपक्षीय चर्चापरराष्ट्र मंत्रालयाने दोन्ही नेत्यांमधील द्विपक्षीय चर्चेबाबत एक निवेदन जाहीर केले आहे. या द्विपक्षीय चर्चेवेळी दोघांनी भारत आणि इटलीमधील धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीचा आढावाही घेतला. उभय नेत्यांनी स्वच्छ ऊर्जा, उत्पादन, विज्ञान आणि तंत्रज्ञान, दूरसंचार, एआय आणि खनिजांच्या क्षेत्रातील संबंध वाढवण्याचे आवाहन केले. तसेच, या चर्चेवेळी नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या महायुद्धात इटलीच्या मोहिमेतील भारतीय लष्कराचे योगदान मान्य केल्याबद्दल इटली सरकारचे आभार मानले. याशिवाय, भारत सरकार इटलीतील मॉन्टोन येथे यशवंत घाडगे (दुसऱ्या महायुद्धातील शहीद योद्धे) यांचे स्मारक विकसित करणार असल्याचे जाहीर केले.