नवी दिल्ली: आपल्या संतूरवादनाची मोहिनी संपूर्ण जगावर घालणारे ज्येष्ठ संतूर वादक आणि संगीतकार शिवकुमार शर्मा (Shivkumar Sharma) यांचे मंगळवार, १० मे २०२२ रोजी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच भारतीय संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. देशातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी आदरांजली वाहिली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील शिवकुमार शर्मा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सोशल मीडियावर ट्विट करुन त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. याबरोबरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी देखील शिवकुमार शर्मा यांच्या कुटुंबियांप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे.
शिवकुमार शर्मा यांनी संतूर वाद्य आणि संतूर वादनाला जगभरात प्रतिष्ठा मिळवून दिली. संतूरला मानाचे स्थान प्राप्त करून दिले. जगभरात संतुरवादनानं श्रोत्यांना स्वरानंद देणाऱ्या पंडित शिवकुमार शर्मा यांचा चाहतावर्ग मोठा होता. अतिशय संघर्षमय परिस्थितीतून त्यांनी वाट काढत आपली स्वःताची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीत विश्वाला मोठा हादरा बसला असून त्यामुळे मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
देशाच्या सांस्कृतिक विश्वाची मोठी हानी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवकुमार शर्मा यांना श्रद्धांजली वाहिली. आपल्या देशाच्या सांस्कृतिक विश्वाची मोठी हानी झाली आहे. आपण पंडित शिवकुमार शर्मा यांना गमावले आहे. त्यांच्या जाण्याने तीव्र वेदना झाल्या आहेत. संतुरवादनाने ते जगभर ओळखले गेले. त्यांना त्या वाद्याने वेगळी ओळख निर्माण करुन दिली. भारतीय संगीत विश्वात भरीव कामगिरी करण्यात त्यांचे योगदान मोठे होते. त्यांनी निर्माण केलेल्या कलाकृती, त्यांच्या संगीतरचना या नव्या पिढीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरणार आहेत. त्यांचे कर्तृत्व कधीही विसरता येणार नाही. मी त्यांच्या कुटूंबियाप्रती सहानुभूती व्यक्त करतो आहे. ओम शांती, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.
आपल्या संतुरवादनाने एक वेगळा विचार श्रोत्यांना दिला
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही शिवकुमार शर्मा यांना आदरांजली वाहिली आहे. पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधनाची बातमी कळताच धक्का बसला आहे. त्यांचे जाणे दु:खदायक आहे. संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते शिवकुमार शर्मा यांच्यासोबत माझे घनिष्ठ संबंध होते. संगीतविषयक अनेक गोष्टींवर चर्चा होत असे. आपल्या संतुरवादनाने एक वेगळा विचार त्यांनी श्रोत्यांना दिला. आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीतील संतुरवादनाने त्यांनी श्रोत्यांना जिंकून घेतले होते, असे ट्विट गडकरी यांनी केले आहे.