नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त पीएम स्कूल फॉर रायझिंग इंडिया (PM-SHRI) योजनेची घोषणा केली आहे. याअंतर्गत देशभरात 14,500 शाळा विकसित केल्या जाणार आहेत. या सर्व मॉडेल शाळा बनतील आणि यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची पूर्ण भावना अंतर्भूत असणार आहे. दरम्यान, शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांशीही संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आपल्याला केवळ विद्यार्थ्यांना शिकवायचे नाही तर त्यांचे जीवनही बदलायचे आहे.
पीएम श्री योजनेची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने गेल्या काही वर्षांत शिक्षण क्षेत्रात बरेच बदल केले आहेत. पीएम श्री स्कूल एनईपीच्या भावनेने देशातील लाखो विद्यार्थ्यांना फायदा होईल. या शाळांमध्ये आधुनिक, परिवर्तनशील आणि सर्वांगीण शिक्षण देण्याची पद्धत असेल. याशिवाय, नवीन तंत्रज्ञान, स्मार्ट क्लास रूम, क्रीडा आणि आधुनिक पायाभूत सुविधांकडेही लक्ष दिले जाणार आहे.
दरम्यान, या शाळांमध्ये पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतचे शिक्षण असेल. पीएम श्री योजनेमध्ये लागू केल्या जाणार्या एनईपी तरतुदी परीक्षा उत्तीर्ण होण्यापेक्षा प्रत्येक वर्गात नवीन शिकण्यावर अधिक भर देतील. या शाळांमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक तसेच पुस्तकी ज्ञानही शिकता येईल.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्वप्रथम जूनमध्ये पीएम श्री योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार पीएम श्री शाळांसाठी नवीन पायाभूत सुविधा निर्माण करण्याऐवजी जुन्या सरकारी शाळांचा दर्जा वाढवण्यात येणार आहे. हे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांवर चालवले जातील. पीएम श्री शाळांचा खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. तर, योजनेची अंमलबजावणी आणि देखरेख करण्याची जबाबदारी राज्य सरकारची असणार आहे.