BSNL Revival Plan: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज ( बुधवारी) एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनेक मोठ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आणि निर्णयही घेण्यात आले. कॅबिनेट आणि कॅबिनेट कमिटी ऑन इकनॉमिक अफेयर्स यांच्यासदर्भाती काही निर्णय देखील या बैठकी दरम्यान घेतले गेले. या बैठकीत सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) च्या पुनरुज्जीवानासाठी १.६४ लाख कोटी रुपयांचे रिवायवल पॅकेजला मंजूरी देण्यात आली.
कॅबिनेट बैठकीमधील निर्णयांची माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, 'बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी सरकारने १,६४,१५६ कोटी रुपयांचे पुनरुज्जीवन पॅकेज मंजूर केले आहे. याशिवाय, मंत्रिमंडळाने भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आणि भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड (BBNL) यांच्या विलीनीकरणालाही मंजुरी दिली.
BSNL-BBNL मर्जिंगचा महत्त्वपूर्ण निर्णय
BSNL आणि BBNL यांच्या विलीनीकरणामुळे, BSNL कडे आता देशभरात पसरलेल्या BBNL च्या ५.६७ लाख किमी ऑप्टिकल फायबरचे संपूर्ण नियंत्रण असेल. सरकार येत्या तीन वर्षांत BSNL साठी २३,००० कोटी रुपयांचे बॉन्ड जारी करणार आहे. त्याच वेळी, सरकार MTNL साठी २ वर्षांत १७,५०० कोटी रुपयांचे बॉन्ड जारी करणार आहे. बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी सरकारने १,६४,१५६ कोटी रुपयांचे पुनरुज्जीवन पॅकेज मंजूर केले आहे. यामुळे टेलिकॉम कंपनीला 4G वर अपग्रेड होण्यास मदत होणार आहे, असेही अश्विनी वैष्णव म्हणाले.
BSNL चे ६.८० लाख किमी पेक्षा जास्त ऑप्टिकल फायबर नेटवर्कचे जाळे आहे. तर BBNL ने देशातील १.८५ लाख ग्रामपंचायतींमध्ये ५.६७ लाख किलोमीटर ऑप्टिकल फायबरचे जाळे प्रस्थापित केले आहे. कंपनी मर्जिंग म्हणजेच विलिनीकरणामुळे युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड (USOF) द्वारे BBNL ने घातलेल्या फायबरचे नियंत्रण BSNL ला मिळेल.