नवी दिल्ली - गंगा स्वच्छता अभियान हा मुद्दा मोदी सरकारच्या कार्यक्रमातील महत्वांच्या मुद्द्यांपैकी एक आहे. पंतप्रधान मोदींनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने 'नमामी गंगे मिशन'अंतर्गत उत्तराखंडमध्ये सहा मोठ्या प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी, जल जीवन मिशनच्या माध्यमातून घरा-घरात शुद्ध पाणी पोहोचवले जाईल. गंगा म्हणजे आपला वारसा आहे. ती देशातील अनेकांना समृद्ध बनवते. यापूर्वीही गंगा स्वच्छतेच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबवले गेले आहेत. मात्र, त्यात जनतेची भागीदारी नव्हती. जर त्याच पद्धतींचा अवलंब केला गेला असता, तर गंगा स्वच्छ झाली नसती, असे मोदी म्हणाले. याच बरोबर, कृषी विधेयकावरून देशभरात सुरू असलेल्या विरोधकांच्या विरोधावरही त्यांनी हल्ला चढवला.
शेतकऱ्यांचा अपमाण करतायत विरोधक -मोदी म्हणाले, शेतकऱ्यांनी स्वतंत्र व्हावे, अशी कृषी कायद्याला विरोध करणाऱ्यांची इच्छा नाही. शेतकरी ज्याची पूजा करतो त्याच गोष्टींना विरोधकांकडून आग लावली जात आहे. याच वेळी, देशात MSP कायम राहणार आहे आणि विरोधक MSP वरून जो दावा करत आहेत, तो खोटा आहे, असा पुनरुच्चारही मोदींनी केला.
"आज केंद्र सरकार, शेतकऱ्यांना त्यांचे अधिकार देत आहे. तरीही हे लोक विरोध करत आहेत. शेतकऱ्याला खुल्या बाजारात आपले पिक विकता येऊ नये, अशी या लोकांची इच्छा आहे. ज्या साहित्याची आणि उपकरणांची शेतकरी पूजा करतो, त्यांना आग लाऊन, हे लोक शेतकऱ्यांचा आपमाण करत आहेत," असे मोदी म्हणाले.
नमामी गंगेअंतर्गत 30 हजार कोटींहून अधिकच्या योजनांचे काम सुरू -पंतप्रधान म्हणाले, आता गंगेत घाणेरडे पाणी जाण्यापासून अडवले आहे. हे प्लँट भविष्याच्या दृष्टीने तयार करण्यात आले आहेत. तसेच गंगा नदी काठी असलेल्या शंभरवर शहरांना उघड्यावर शौच करण्यापासून मुक्त केले आहे. गंगा नदी बरोबरच तिला जोडल्या जाणाऱ्या इतर नद्याही स्वच्छ करण्यात येत आहेत. एवढेच नाही, तर नमामी गंगे अंतर्गत 30 हजार कोटींहून अधिकच्या योजनांचे काम सुरू आहे.
ट्रॅक्टरला आग लावून व्यक्त केला होता निशेध -केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला देशभरात मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. दिल्लीच्या उच्च सुरक्षा विभागाअंतर्गत येणाऱ्या इंडिया गेटजवळ काही लोकांनी ट्रॅक्टरला आग लावल्याची घटना घडली. कृषी विधेयकाविरोधात शेतकरी आक्रमक झाले असून ट्रॅक्टरला आग लावून त्यांनी निषेध व्यक्त केला आहे. सोमवारी (28 सप्टेंबर) सकाळी इंडिया गेटजवळ ही घटना घडली आहे.