चौकीदार विश्रांती घेत नसल्यानं चोरांची झोप उडाली- पंतप्रधान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 05:35 PM2018-12-27T17:35:30+5:302018-12-27T17:36:39+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर जोरदार टीका
धर्मशाला: देशाचा चौकीदार विश्रांती घ्यायला तयार नाही. त्यामुळे चोरांची झोप उडाली आहे, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना लक्ष्य केलं आहे. हिमाचल प्रदेशातील जयराम ठाकूर सरकारच्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित जन आभार रॅलीला संबोधित करताना मोदींनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. एक पद, एक निवृत्ती वेतनावरुन काँग्रेस पक्षानं खोटं आश्वासन दिलं. पंजाब आणि कर्नाटकात काँग्रेसनं शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिलाच नाही, अशी टीका मोदींनी केली.
काँग्रेसप्रणित यूपीए सरकारनं हिमाचल प्रदेशला सापत्नपणाची वागणूक दिल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला. 'यूपीए सरकारकडून हिमाचल प्रदेश सरकारला २१ हजार कोटी रुपये दिले जायचे. मात्र आताचं एनडीए सरकार राज्याला ७२ हजार कोटी रुपये देतं आहे,' अशी आकडेवारी मोदींनी सांगितली. हिमाचलमध्ये आल्यावर घरी आल्यासारखं वाटतं, असंदेखील ते पुढे म्हणाले.
'शौर्य, सामर्थ्य या भूमीवरील प्रत्येकाच्या रक्तात आहे. हिमाचल देवी आणि देवतांची भूमी आहे. इथलं प्रत्येक गाव देवी-देवतांचं आहे. इथल्या शांतीच्या कुशीतून शौर्य जन्माला येतं. हीच हिमाचलची ओळख आहे. एक वर्षात हिमाचल सरकारनं विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो,' अशा शब्दांमध्ये मोदींनी राज्य सरकारचं कौतुक केलं.