ओडिशा - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशातील बलांगीरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी झारसुगुडातील मल्टी मॉडेल लॉजिस्टिक्स पार्कसहीत (एमएमएलपी) अनेक विकास योजनांचे लोकार्पण केले. बलांगीर आणि बिचुपलीदरम्यान निर्माण करण्यात आलेल्या नवीन रेल्वेमार्गाचेही उद्घाटन करण्यात आले आहे. उद्घाटन कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना संबोधित केले.
येथील जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी ओडिशा सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की,'गरीब कुटुंबीयांचे हक्क हिरावून घेणारी प्रत्येक गोष्टी व्यवस्थेतून दूर करण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे.आदिवासांच्या हितांसाठी ओडिशा सरकारनं निवडणुकांची वाट पाहत बसू नये, केंद्र सरकारकडून ज्या निधीचा पुरवठा करण्यात आला आहे, त्याचा जनतेच्या भल्यासाठी वापर करावा. निवडणुका येतील आणि जातीलही.
'सरकारचा पैसा खाणाऱ्या मध्यस्थांना संपवलं'भाजपा पक्ष सत्तेत आल्यानंतर आम्ही 6 कोटींहून अधिक बोगस रेशन कार्ड, बोगस गॅस कनेक्शन, बोगस स्कॉलरशिप लाभार्थ्यांना शोधून काढलं. ज्या मध्यस्थी करणाऱ्या व्यक्ती सरकारी पैसा स्वतःच्या खिशात भरत होते, त्या सर्वांना अद्दल घडवण्यात आली.
'ज्यांची कमाई थांबवली, त्यांना याचा बदला घ्यायचा आहे'पंतप्रधान मोदी पुढे असंही म्हणाले की,आम्ही या मध्यस्थांची झोप उडवली म्हणून मोदी त्यांच्या डोळ्यात खुपू लागलेत. ही लोक जी सबसिडीचे 90 हजार कोटी रुपयांची लूट करत होते, ही लूट करण्यापासून मी या सर्वांना रोखले. सरकारी पैशांतून ही लोक विमानातून प्रवास करत होते, गाडी-बंगले विकत घेत होते. ज्यांच्या तिजोरीत सरकारी पैसा येणे थांबलं, म्हणून ते सर्वजण आता माझ्यावर सूड उगवण्यासाठी एकत्र येत आहेत.