नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची बैठक होणार आहे. ७५ वर्षांत प्रथमच संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची बैठक भारतीय पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होत असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रातील भारताचे माजी राजदूत सय्यद अकबरुद्दीन यांनी दिली. भारत आज संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष झाला आहे.
ऑगस्ट २०२१ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचं अध्यक्षपद भारताकडे असेल. या कालावधीत एक उच्चस्तरीय बैठक घेतली जाणार असून त्यामध्ये सागरी सुरक्षा, दहशतवाद आणि शांतता प्रस्थापित करण्यासंदर्भात चर्चा करण्यात येईल अशी माहिती संयुक्त राष्ट्रातील भारताचे प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी दिली. '७५ वर्षांत प्रथमच भारतीय नेतृत्त्वानं संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या कोणत्याही कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवण्यात रस दाखवला,' असं अकबरुद्दीन म्हणाले.
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत १५ देश आहेत. यापैकी ५ स्थायी आणि १० अस्थायी सदस्य आहेत. स्थायी देशांमध्ये चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिकेचा समावेश आहे. भारत परिषदेचा अस्थायी सदस्य आहे. अस्थायी सदस्य म्हणून भारताला २ वर्षांचा कालावधी मिळाला आहे. १ जानेवारी २०२१ पासून या कालालधीची सुरुवात झाली आहे.