जगतियाल (तेलंगणा): ‘इंडिया’ आघाडीने आपल्या जाहीरनाम्यात शक्तीला संपवण्याची, नष्ट करण्याची घोषणा केली. मी त्यांचे आव्हान स्वीकारतो. माता-भगिनींच्या सुरक्षेसाठी मी माझ्या प्राणांची आहुती देईन, असे वक्तव्य पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथील निवडणूक प्रचारसभेत केले.
ते म्हणाले, ‘इंडिया’ आघाडीचा जाहीरनामा ‘शक्ती’ संपवण्याची भाषा बोलतो, आता लढाई ‘शक्ती’ नष्ट करू इच्छिणारे आणि त्यांची पूजा करणारे यांच्यात आहे. आपल्यासाठी प्रत्येक आई आणि प्रत्येक मुलगी हे ‘शक्ती’चे रूप आहे आणि आपण त्यांची पूजा करतो. पंतप्रधान म्हणाले की, देशाने ‘चंद्रयान’चे यश ‘शिवशक्ती’ला समर्पित केले आणि विरोधी पक्ष ‘शक्ती’ नष्ट करण्याचे बोलत आहे. रविवारी मुंबईत ‘इंडिया’ आघाडीने आपला जाहीरनामा जाहीर केला. मुंबईच्या सभेत आपला लढा ‘शक्ती’विरुद्ध असल्याचे सांगितलेमाझ्यासाठी, प्रत्येक आई, प्रत्येक मुलगी ही ‘शक्ती’चे रूप असते. माता-भगिनींनो, मी तुमची ‘शक्ती’ म्हणून पूजा करतो. मी भारतमातेचा पुजारी आहे.
४०० पेक्षा जास्त जागा जिंकणार!
मोदी म्हणाले की, मतदानाचा दिवस जवळ येत असताना तेलंगणात भाजपची लाट दिसत आहे, तर काँग्रेस आणि बीआरएस साफ होतील. संपूर्ण देश म्हणत आहे ४ जून रोजी ४०० हून अधिक (एनडीएसाठी जागा), असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. शिवमोगा येथील प्रचारसभेत मोदी म्हणाले, जेव्हा मी शिवाजी पार्कमधून शक्ती संपवण्याची घोषणा ऐकली, तेव्हा मला वाटले की यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला किती त्रास झाला असेल?
उल्लेख ‘धार्मिक’ नव्हता; अधर्म, भ्रष्टाचाराबद्दल बोललो : राहुल गांधी
इंडिया आघाडीच्या रविवारी मुंबईत झालेल्या सभेत मी शक्तीचा धार्मिक गोष्टींसंदर्भात उल्लेख केलेला नव्हता. अधर्म, भ्रष्टाचार, खोटेपणा यांच्याबद्दल मी शक्तीचा उल्लेख केला होता असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ एक मुखवटा आहेत. ते आपले लक्ष विचलित करण्याचे काम करतात. देशाची व्यवस्था नियंत्रित करणारी शक्ती वेगळी आहे अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. त्यांनी शक्तीवर धार्मिक अंगानेच टीका केली असल्याचा आरोप होऊ लागला होता. त्याबाबत राहुल गांधी यांनी सांगितले की, मी जे बोलतो ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवडत नाही. ते नेहमी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न करतात. पंतप्रधानांनी ज्या शक्तींचा मुखवटा परिधान केला आहे, त्यांच्या विरोधात आम्ही लढा देत आहोत. या शक्तीने सीबीआय, आयकर खाते, ईडी, निवडणूक आयोग, प्रसारमाध्यमे, देशातील उद्योग, घटनात्मक यंत्रणा या सर्वांवरच नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न चालविला आहे.
‘देशाच्या संपत्तीचा होतोय लिलाव’
राहुल गांधी म्हणाले की, विशिष्ट शक्तीच्या सामर्थ्यांत आणखी वाढ होण्यासाठी देशाच्या संपत्तीचा लिलाव केला जात आहे. मी शक्तीचा धार्मिक अंगाने उल्लेख केलेला नाही. तर भ्रष्टाचार, खोटेपणा करण्यासाठी जी शक्ती सक्रिय आहे, तिच्यावर मी टीका केली आहे.