वाराणसी: पंतप्रधान नरेंद्र मोदीवाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी क्रूझमधून उतरून काशी विश्वनाथसाठी रवाना होत असताना त्यांचं पुष्पवृष्टीनं स्वागत झालं. त्यावेळी एक वृद्ध गर्दीत उभे होते. त्यांना मोदींना पगडी घालायची होती. सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवलं. हे दृश्य पाहताच मोदींनी त्यांची कार रोखण्यास सांगितली. त्यानंतर मोदींनी त्या वृद्धाच्या हातून पगडी परिधान केली.
पंतप्रधान मोदींच्या वाहनांचा ताफा वाराणसीच्या गल्ल्यांमधून जात असताना मोठी गर्दी जमली होती. मोदींची एक झलक पाहण्यासाठी हजारो जण रस्त्याच्या कडेला उपस्थित होते. रस्त्याचा शेजारी उभ्या असलेल्या एका वृद्धानं मोदींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एसपीजींच्या गराड्यातून मोदींपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र एसपीजींनी त्यांना धक्का देऊन मागे सारलं. त्या वृद्धाच्या हातात एक पगडी आणि गमछा होता. त्या वृद्धाला मोदींना पगडी घालायची होती.
एसपीजींनी दोनवेळा वृद्धाला धक्का देऊन मागे ढकललं. हे पाहून मोदींनी कार थांबवली. त्यांनी सुरक्षारक्षकांना इशारा केला आणि वृद्धाकडे पाहिलं. त्यानंतर मोदींनी वृद्धाकडून पगडी आणि गमछा मागितला. मोदींनी वृद्धाला जवळ बोलावलं. कारचा दरवाजा उघडला आणि वृद्धाच्या हातून पगडी घालून घेतली. वृद्धानं मोदींना गळ्यात गमछा घातला. पंतप्रधानांनी हात जोडून त्यांना अभिवादन केलं. त्यानंतर वृद्धानं मोदी मोदी म्हणत घोषणा दिल्या.