PM Narendra Modi Oath Ceremony :नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी पंतप्रधान मोदी यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात चंद्रमोहन नायडू यांच्या टीडीपी पक्षातून दोन खासदारांना मंत्री करण्यात आले आहेत. चंद्रशेखर पेम्मासानी आणि राम मोहन नायडू किंजरापू यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. यातील टीडीपी खासदार राम मोहन हे सर्वात लोकप्रिय नावांपैकी एक आहे. खासदार राम मोहन हे केवळ ३६ वर्षांचे असून मोदी ३.० मंत्रिमंडळामधील सर्वात तरुण मंत्री आहेत.
टीडीपीचे खासदार किंजरापू राम मोहन नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. एनडीएमध्ये भाजपनंतर टीडीपी हा सर्वात मोठा पक्ष आहे, ज्याला १६ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे टीडीपीला दोन मंत्रिपदे देण्यात आली आहेत. त्यातच आता राम मोहन नायडूंना महत्त्वाचे मंत्रिमंडळ मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री बनलेले राम मोहन नायडू हे चंद्राबाबू नायडू यांच्या जवळचे मानले जातात. वयाच्या २६ व्या वर्षी पहिल्यांदाच विजयी होऊन ते खासदार झाले.
२३ कोटींची संपत्ती
लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, राममोहन नायडू यांची एकूण संपत्ती २३.३० कोटी रुपये आहे. तर त्यांच्यावर २ कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे. राममोहन नायडू यांनीही शेअर बाजारात मोठी गुंतवणूक केली आहे. शेअर्समधील गुंतवणुकीत राममोहन नायडू यांनी १.१० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. राममोहन नायडू यांच्याकडे १.४५ लाख रुपयांची रोकड आहे. तर त्यांच्या पत्नीकडे सुमारे २ लाख रुपयांची रोकड आहे. याशिवाय त्यांच्या बँक खात्यांमध्ये ३ कोटींहून अधिक रक्कम जमा आहे. यासोबतच त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर सुमारे ४८ लाख रुपयांच्या एलआयसी पॉलिसी आहेत. राममोहन नायडू आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे अंदाजे १.५१ कोटी रुपयांचे दागिने आहे.
वडिलांच्या निधनानंतर राजकारणात प्रवेश
राम मोहन नायडू यांनी त्यांच्या वडिलांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्यानंतर राजकारणात प्रवेश केला होता. वडिलांचे अकाली निधन झाले नसते तर कदाचित राम मोहन नायडू राजकारणात दिसले नसते. दिल्लीत शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले होते. येथे त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर एमबीए केले. यानंतर राम मोहन नायडू हे सिंगापूरला गेले, जिथे ते वडिलांच्या निधनाच्या बातमीने त्यांना धक्का बसला. नायडू हे २४ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर नायडू हे सर्व काही सोडून ते मायदेशी परतले आणि त्यांनी वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेण्याचा निर्णय घेतला.