Narendra Modi wishes Manmohan Singh: पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी गुरुवारी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीबाबत विचारणा केली. त्यांच्या आरोग्याविषयी जाणून घेतले. तसेच पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नरेंद्र मोदींनी लिहिले- माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो अशी मी प्रार्थना करतो.
मनमोहन सिंग यांच्या कार्याचे केले होते कौतुक
८ फेब्रुवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत डॉ. मनमोहन सिंग यांचे कौतुक केले होते. माजी पंतप्रधान नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली (सुधारणा) विधेयक, २०२३ सरकारच्या विरोधात मतदान करण्यासाठी व्हीलचेअरवर संसदेत आले होते. तेव्हा पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, ते कोणत्या पक्षाला बळकट करण्यासाठी आले आहेत याने काही फरक पडत नाही, पण त्यांचे व्हीलचेअरवर बसून संसदेत येणे आणि मतदानात भाग घेणे हे लोकशाहीची ताकद दर्शवते.
देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी झाला. तर आज मनमोहन सिंग ९२ वर्षांचे झाले. पीएम मोदींसोबतच अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, मनमोहन सिंग यांनी देशाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. आपल्या देशाचे भविष्य घडविण्यासाठी तुमची नम्रता, बुद्धिमत्ता आणि नि:स्वार्थ सेवा मला आणि कोट्यवधी भारतीयांना प्रेरणा देत राहील.
आर्थिक सुधारणांचे शिल्पकार
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे २००४ ते २०१४ या काळात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए वन आणि यूपीए टूच्या काळात देशाचे पंतप्रधान होते. १९९१-९६ दरम्यान पीव्ही नरसिंह राव सरकारमध्ये ते केंद्रीय अर्थमंत्री होते. अर्थमंत्री असताना त्यांनी देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी क्रांतिकारी प्रयत्न केले होते. त्यांना देशाच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार म्हटले जाते. राजकारणात येण्यापूर्वी मनमोहन सिंग १९८५ ते १९८७ या काळात नियोजन आयोगाचे प्रमुख होते. त्यापूर्वी ते १९८२ ते १९८५ या काळात RBIचे गव्हर्नरही होते. बँकिंग क्षेत्रातील सुधारणांचे श्रेयही त्यांना जाते.