नवी दिल्ली - न्यूयॉर्कमध्ये पोहचलेले परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत त्यांचे रंजक किस्से शेअर केले. पंतप्रधान मोदी बदल घडवून आणू शकतात का? असं तुम्ही मला विचारता परंतु नरेंद्र मोदी स्वत: एका बदलाचा परिणाम आहेत. त्यांच्यासारखा कुणी देशाचा पंतप्रधान बनू शकतो यावरून भारत देश किती बदलला आहे हे लक्षात येते असं विधान एस जयशंकर यांनी 'Modi @ 20: Dreams Meet Delivery' या पुस्तकावरील चर्चेदरम्यान केले.
परराष्ट्र मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींसोबत एक संस्मरणीय किस्सा शेअर केला. ते म्हणाले, जेव्हा अफगाणिस्तानवर तालिबानने हल्ला केला होता आणि भारतीय विद्यार्थ्यांना तेथून बाहेर काढण्यासाठी मोहीम राबवली जात होती तेव्हा पीएम नरेंद्र मोदींनी मला मध्यरात्री फोन केला आणि थेट विचारले, तुम्ही जागे आहात का? मी होय असं उत्तर दिलं. यानंतर पंतप्रधानांनी विचारले, तुम्ही टीव्ही पाहत आहात, तिथे काय चाललं आहे? तर त्यावर मी म्हणालो की, मदत थोड्याच वेळात पोहोचते आहे.
थेट मला कॉल करा, मोदी मोठ्याने म्हणालेया संभाषणाची आठवण करून देताना परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले की, पंतप्रधान म्हणाले, मदत आल्यावर मला फोन करा. मी म्हणालो सर अजून दोन तीन तास लागतील. ते पूर्ण झाल्यावर मी तुमच्या कार्यालयाला कळवेन. यानंतर पीएम मोदी मोठ्याने म्हणाले, नाही…मला थेट कॉल करा. पंतप्रधानांमध्ये हा एक अद्वितीय गुण आहे असं कौतुक परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी केले.
यावेळी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी IBSA च्या त्रिपक्षीय मंत्रिस्तरीय आयोगाच्या दहाव्या बैठकीचे आयोजन केले होते. त्यांनी इब्साच्या प्रक्रियेचा आढावा घेतला आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले. या बैठकीला ब्राझीलचे परराष्ट्र मंत्री कार्लोस फ्रँका आणि दक्षिण आफ्रिकेचे आरोग्य मंत्री जो फाहला देखील उपस्थित होते. IBSA ने जारी केलेल्या संयुक्त निवेदनानुसार, मंत्र्यांनी जगभरात होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांचा निषेध केला. मंत्र्यांनी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत दहशतवाद्यांची सुरक्षित आश्रयस्थाने नष्ट करण्यासाठी पुढाकार घेऊन एकजुटीबाबत स्पष्ट सांगितले.