नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरमधील संघाच्या मुख्यालयात जाऊन विविध मुद्द्यावर सरसंघचालकांशी चर्चा करणार आहेत. लोकसभा निवडणुकीचे निकाल 23 मे रोजी लागणार आहेत त्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
मागील चार वर्षातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संघ मुख्यालयातील पहिला दौरा आहे. लोकसभा निवडणुकीत एनडीएला पूर्ण बहुमत मिळालं नाही तर अशा स्थितीत आरएसएस पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींच्या ऐवजी दुसऱ्या नावाचा विचार करु शकतं अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीतून मोदी संघाचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न करतायेत का? अशीही शक्यता वर्तवली जात आहे. गेली काही वर्षे मोदींनी संघ मुख्यालयापासून लांब राहणं पसंत केलं होतं.
भाजपाच्या नागपूर येथील ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा बहुमताने केंद्रात सत्ता स्थापन करेल पण बहुमत मिळालं नाही तर नरेंद्र मोदींसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. अखेर भाजपाच्या राजकारणामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका महत्त्वपूर्ण मानली जाते. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या भेटीमागे नेमकं काय शिजतंय हे आगामी काळात स्पष्ट होईल.
१७ व्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळून देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच सरकार सत्तेवर येईल, यावर रविवारी प्रसिद्ध झालेल्या विविध मतदानोत्तर एक्झिट पोलमध्ये अंदाजांमध्ये एकवाक्यता दिसून आली. 23 मे रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. मात्र त्याआधी विविध चॅनेल आणि दैनिकांनी सर्व्हेच्या माध्यमातून जनतेचा जाणून घेतलेला लोकसभेचा मूड यावरुन निवडणूक निकालांचे अंदाज बांधण्यात येतात. निवडणूक निकालांच्या या सर्व्हेवरून देशात कोणाचं सरकार येणार हे सांगितले जाते. त्यामुळे निकालानंतर भारतीय जनता पार्टीची भूमिका आणि रणनीती काय असेल हे पाहणं गरजेचे आहे.