कारगिल : भारताने नेहमीच युद्धाकडे पहिला नव्हे तर अंतिम उपाय म्हणून पाहिले आहे. मात्र देशाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या कोणालाही चोख प्रत्युत्तर देण्याचे सामर्थ्य आमच्या संरक्षण दलांकडे आहे. सामर्थ्य असेल तरच शांतता प्रस्थापित करता येते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते म्हणाले की, सीमा सुरक्षित असतील. अर्थव्यवस्था मजबूत असेल व समाजात आत्मविश्वासाची कमतरता नसेल तर देशाला कोणताही धोका निर्माण होणार नाही.
मोदी यांनी सोमवारी कारगिल येथे जाऊन लष्करी जवानांसोबत दिवाळी साजरी करून त्यांचा आनंद द्विगुणित केला. त्यावेळी केलेल्या भाषणात ते म्हणाले की, १९९९ साली भारतीय जवानांनी कारगिल युद्धात विजय मिळविला होता. त्यांनी दहशतवादी कारवायांचा नायनाट केला होता. त्या युद्धानंतर मी कारगिलला भेट दिली होती. पाकिस्तानबरोबरच्या सर्व युद्धांमध्ये भारतीय लष्कराने विजय मिळविला आहे. कारगिल युद्धानंतरची सर्व स्थिती मी जवळून पाहिली आहे. त्याच आठवणी मनात जागवून कारगिलमध्ये जवानांबरोबर दिवाळी साजरी करण्यासाठी पुन्हा मी या ठिकाणी आलो. (वृत्तसंस्था)
'सुरक्षेसाठी आत्मनिर्भर झाले पाहिजे'पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, आपला देश अंतर्गत व बाह्य शत्रूंचा अत्यंत कठोरपणे मुकाबला करत आहे. दहशतवाद, नक्षलवाद, घातपाती कारवायांचा समूळ नाश करण्यासाठी आम्ही योग्य पावले उचलली आहेत.देशाच्या सुरक्षेसाठी आत्मनिर्भर होणे अतिशय आवश्यक आहे. विदेशी शस्त्रे तसेच शस्त्रप्रणालीवरील अवलंबित्व खूप कमी होण्याची आवश्यकता आहे.
लष्कर अधिक बलशाली करणारगेल्या आठ वर्षांपासून आमच्या सरकारने लष्कर अधिक बलशाली होण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. नवे तंत्रज्ञान, सीमाभागात पायाभूत सुविधांचा विकास, संरक्षण दलांमध्ये महिला उमेदवारांची भरती अशा गोष्टींना प्राधान्य देण्यात आले. महिलांच्या भरतीमुळे लष्कराचे सामर्थ्य आणखी वाढणार आहे.- पंतप्रधान नरेंद्र मोदी