नवी दिल्ली – दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला असून त्याने हाहाकार माजला आहे. भारतातही केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याने सर्व राज्यांना पत्र लिहून आंतरराष्ट्रीय प्रवाशांची स्क्रिनिंग आणि टेस्टिंग कडक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटने सर्वांची चिंता वाढवली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
पंतप्रधानांसोबतच्या या बैठकीत कोरोना व्हायरस आणि लसीकरण यावर महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. या बैठकीत कॅबिनेट सचिव राजीव गौबा, पंतप्रधानांचे सचिव पी. के मिश्रा, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण, नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के पॉल उपस्थित आहेत. भारतीय INSACOG कोविड १९ चा नवा व्हेरिएंट B.1.1.1529 यावर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. अद्याप देशात हा व्हेरिएंट आढळल्याचं पुढे आलं नाही. दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या नव्या व्हेरिएंटचे स्पाइक म्यूटेशन जास्त असल्याची शक्यता आहे.
जीनोम सीक्वेसिंगसाठी सँपल पाठवले
सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांकडून सँपल्स एकत्र केले जात आहे. यातील पॉझिटिव्ह सॅँपल्सला प्राधान्याने बी.१.१.५२९ तपासणीसाठी पाठवले जात आहेत. आरोग्य मंत्रालय आणि जैवतंत्रज्ञान विभागाने आधीच परिस्थितीचा आढावा घेतला आहे. केंद्राने गुरुवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोत्सवाना येथून येणार्या किंवा जाणार्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कठोर स्क्रिनिंग आणि टेस्टिंग करण्यास सांगितले आहे.
केंद्राचं सर्व राज्यांना पत्र
केंद्र सरकारने सर्व राज्यांना अलर्ट केले आहे. सरकारने पत्र लिहून राज्यांना आदेश दिलेत की, सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कठोर तपासणी करा. दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोत्सवाना येथून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनिंग करा. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना पत्र लिहिलं आहे. तर दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी DDMA बैठक बोलावली असून नव्या कोरोना व्हेरिएंटपासून बचाव करण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
WHO मते, पुढील काही दिवसांत कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट B.1.1529 यावर काही बोलणं शक्य होईल. सध्या त्याला VE टॅग दिला आहे. पुढे Variant of Concern जसं होईल तसं त्याला ग्रीक नाव दिले जाईल. सध्या इतकचं सांगता येऊ शकतं की त्याचा प्रसार रोखायला हवा कारण हा व्हेरिएंट जितका पसरेल तितका त्याचा म्यूटेट होईल. कोरोना लसीचे डोस सर्वांनी घ्यावेत आणि सुरक्षित राहावं असं आवाहन सर्वांना करण्यात आले आहे.