ठाणे - समृद्धी महामार्गावर ठाणे जिल्ह्यातील शहापूरजनिक पुलावरील काम सुरू असताना ग्रेडर मशिन कोसळल्याने मोठा अपघात झाला. त्यामध्ये, १७ कामगारांचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी झाले आहेत. सोमवारी मध्यरात्री सरलांबेजवळ ही दुर्घटना घडली. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मंत्री दादा भुसे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. तसेच, अपघातस्थळी भेट देत पाहणीही केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मध्यरात्रीच घटनेची माहिती घेत संबंधित यंत्रणांना मदतीचे निर्देश आले आहेत. आता, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करुन शहापूर दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन मोदींना गौरविण्यात येणार आहे. त्याच, पार्श्वभूमीवर पुण्यात मोठा बंदोबस्त लावण्यात आला असून नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आजचा कार्यक्रम होत आहे. दरम्यान, ठाण्यातील शहापूरजवळ भीषण दुर्घटना घडली. येथील पुलाचे काम सुरू असताना ग्रेडर-मशिन कोसळून मोठा अपघात झाला. त्यात, १७ जणांचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी आहेत. घटनास्थळावरुन आत्तापर्यंत १६ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून डॉग स्कॉड पथकासह अद्यापही कामगारांचा शोध घेण्यात येत आहे. एनडीआरएफच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्याला सुरुवात केली आहे.
शहापूर तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गपासून ५ ते ६ किलोमीटर ग्रामीण भागात असलेल्या सरलांबे गावच्या हद्दीत समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. या ठिकाणी काल रात्री ११ वाजल्याच्या सुमारास १७ कामगार आणि९ इंजिनियर उपस्थितीत काम सुरू असतानाच अचानक लॉन्चरसह गर्डर हे तिथे काम करणाऱ्या कामगारांवर कोसळले. या घटनेची माहिती मिळताच सर्वांआधी स्थानिक गावकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेऊन मदतकार्य सुरू केलं. त्यानंतर स्थानिक पोलीस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन टीम, इतर कामगांरानी मिळून क्रेनच्या साह्याने गर्डर खाली दबलेल्या कामगारांना बाहेर काढले. अजूनही ४ ते ५ कामगार गर्डर खाली दबले असल्याची माहिती मिळत आहे. तर अद्यापही बचावकार्य सुरू असून पोलीस प्रशासन तसेच प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल् असून आतापर्यत १७ कामगारांचे मृतदेह शहापूरच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उत्तरणीय तपासणीसाठी रवाना केले आहे.
दादा भुसे मध्यरात्रीच घटनास्थळी दाखल
मंत्री दादा भुसे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. तसेच, अपघातस्थळी भेट देत पाहणीही केली. मुख्यमंत्री महोदयांनी रात्री १ वाजताच मला फोन करुन अपघातासंदर्भातील माहिती देत आदेश दिले. त्यानुसार, ताबतडतोब आम्ही सर्वजण टीमसह घटनास्थळी पोहोचलो. तसेच, २० ते २५ मिनिटांत घटनास्थळी मदतकार्याला सुरूवात झाली होती, असे दादा भुसेंनी माध्यमांशी बोलताना सांगितले.