PM Modi, 2036 Olympics: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 141 व्या सत्राचे उद्घाटन केले. हा कार्यक्रम मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला. रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांच्यासह अनेक सेलिब्रिटी या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे 141 वे अधिवेशन भारतात होणे खूप खास आहे. 40 वर्षांनंतर आयओसीचे सत्र भारतात होणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. तसेच भारत ऑलिम्पिक आयोजनात कोणतीही कसर सोडणार नाही, असेही मोदी म्हणाले.
"गेल्या ऑलिम्पिकमध्ये अनेक भारतीय अथलेटिक्सने चांगली कामगिरी केली होती. नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याआधी झालेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्येही आपल्या युवा अथलेटिक्सने नवे विक्रम केले आहेत. २०३६ ऑलिम्पिकचे यशस्वी आयोजन करण्यासाठी भारत कोणतीही कसर सोडणार नाही," अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी ऑलिम्पिक यजमानपदासाठी भारत दावा सांगत असल्याला दुजोरा दिला.
"खेळ हा भारतीय संस्कृतीचा आणि जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग आहे. भारतातील खेड्यापाड्यात गेलात तर प्रत्येक सण खेळाशिवाय अपूर्ण असल्याचे लक्षात येईल. आपण भारतीय केवळ क्रीडाप्रेमी नाही तर खेळ जगणारे लोक आहोत, हे हजारो वर्षांच्या इतिहासात दिसून येते. सिंधू संस्कृती असो, हजारो वर्षांपूर्वीचा वैदिक काळ असो किंवा त्यानंतरचा काळ असो, प्रत्येक कालखंडात भारताची क्रीडा परंपरा खूप समृद्ध राहिली आहे. हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या आपल्या धर्मग्रंथांमध्ये 64 विषयांमध्ये पारंगत असले पाहिजे असे सांगितले आहे. यातील बहुतेक शैली खेळाशी संबंधित होत्या.
पंतप्रधान मोदींनी भारतीय क्रिकेट संघाचे पाकिस्तानविरूद्धच्या विजयाबद्दल अभिनंदन केले. अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये भारताने अतिशय नेत्रदीपक विजयाची नोंद केली असल्याचे ते म्हणाले.