PM Narendra Modi: हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने बाजी मारली असून, गुजरातमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवल्याचे चित्र आहे. यानिमित्ताने दिल्लीत भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला. या आनंदात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, अमित शाह, राजनाथ सिंह यांच्यासह अनेक बडे नेते सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना, देशासमोर आव्हाने असतात, तेव्हा जनतेचा विश्वास भाजपवरच असतो, हा स्पष्ट संदेश या निकालातून मिळाला असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले.
गुजरात, हिमाचल आणि दिल्लीतील नागरिकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले. जिथे भारतीय जनता पक्ष एकहाती विजयी झाला नाही, तिथे भाजपची मतांची टक्केवारी ही पुरेशी आहे. देशातील विविध राज्यांच्या पोटनिवडणुकांमध्येही भाजपप्रती असलेली आपुलकी दिसून येते.उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये भाजपने बाजी मारली आहे. भाजपला मिळालेला जनसमर्थन हे नव्या भारताच्या आकांक्षांचे प्रतिबिंब आहे. भाजपला मिळालेला पाठिंबा हे भारतातील तरुणांच्या विचारांचे प्रकटीकरण आहे. गरीब, शोषित, वंचित, आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी भाजपला हा जनाधार मिळालेला आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
देशासमोर आव्हाने असताना जनतेचा विश्वास भाजपवरच, हे सिद्ध झाले
देशासमोर आव्हाने असतात, तेव्हा जनतेचा विश्वास भाजपवरच असतो, हा स्पष्ट संदेश या निकालातून मिळाला आहे. तरुणांनी मोठ्या संख्येने भाजपला मतदान केले आहे. तरुणांनी आमच्या कामाला तपासून, चाचपणी करून विश्वास दाखवला, हा त्यामागचा संदेश अगदी स्पष्ट आहे. आम्ही कल्पनेवरही भर देतो आणि व्यवस्थाही मजबूत करतो. देश समृद्ध असेल तर देशवासी निश्चितपणे समृद्ध होईल, यात शंका नाही, यात शंका नाही, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
दरम्यान, शॉर्टकट राजकारणाचा मोठा फटका देशाला सहन करावा लागणार आहे, हे देशातील मतदार जाणतो. समाजातील अंतर वाढवून, देशापुढे नवी आव्हाने निर्माण करून, तात्कालिक लाभ घेण्यात मग्न असलेले राजकीय पक्षांना देशातील जनता, देशातील तरुण पिढी जवळून अनुभवत आहे. हे सगळे समजून घेत आहे, असे सांगत पंतप्रधान मोदींनी विरोधकांना कानपिचक्या दिल्या. तसेच आज जो भाजप दिसत आहे, तो मोठ्या कष्टाने इथपर्यंत पोहोचलेला आहे. जनसंघापासून लाखों कार्यकर्त्यांनी अनेक त्याग करून पक्ष इथपर्यंत आणला आहे. कार्यकर्त्यांच्या तपस्येमुळे, त्यागामुळेच आजचा भाजप दिसत असल्याचे पंतप्रधान मोदींनी नमूद केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"