नवी दिल्ली: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केलं आहे. शीला दीक्षित यांच्या निधनानं दु:ख झालं. त्यांनी दिल्लीच्या विकासात मोलाचं योगदान दिलं. माझ्या सहवेदना त्यांच्या कुटुंबियांच्या आणि समर्थकांसोबत आहेत, असं ट्विट मोदी यांनी केलं होतं. शीला दीक्षित यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. आज सकाळी त्यांना एस्कॉर्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र दुपारच्या सुमारास त्यांचं निधन झालं. सध्या शीला दीक्षित यांच्याकडे दिल्ली काँग्रेसची जबाबदारी होती. काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. 'दीक्षित यांच्या निधनाच्या वृत्तानं धक्का बसला. काँग्रेस पक्षाच्या प्रिय कन्या असलेल्या शीला दीक्षित यांच्यासोबत माझे अतिशय जवळचे संबंध होते. माझ्या सहवेदना त्यांच्या कुटुंबासोबत, त्यांनी ज्या दिल्लीची तीन टर्म सेवा केली, त्या दिल्लीकरांसोबत आहेत', अशा शब्दांमध्ये गांधींनी दीक्षित यांना श्रद्धांजली वाहिली.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीदेखील दीक्षित यांना आदरांजली वाहिली. 'दीक्षित यांच्या निधनाचं वृत्त आताच समजलं. दीक्षित यांचं निधन ही दिल्लीची मोठी हानी आहे. त्यांचं योगदान कायम स्मरणात राहील. माझ्या सहवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो,' असं केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटलं.सर्वाधिक काळ दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिलेल्या दीक्षित यांना काँग्रेसनंदेखील श्रद्धांजली अर्पित केली. 'शीला दीक्षित यांच्या निधनाची माहिती समजताच दु:ख झालं. आयुष्यभर काँग्रेसी राहिलेल्या आणि तीन टर्म दिल्लीचं मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या दीक्षित यांनी दिल्लीचा चेहरामोहरा बदलला. आमच्या सहवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आणि मित्र परिवारासोबत आहेत. त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो,' अशा शब्दांत काँग्रेसनं दीक्षित यांनी श्रद्धांजली वाहिली.