नवी दिल्ली: स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन भाषण करताना फेटा घालण्याची परंपरा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यंदादेखील कायम राखली. मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतरच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनी मोदींनी पिवळसर रंगाचा फेटा परिधान केला होता. याशिवाय त्यावर लाल आणि हिरव्या रंगाच्या छटा होत्या. पिवळ्या फेट्यासोबत मोदींनी अर्ध्या बाह्याचा कुर्ता आणि चुडीदार परिधान केला होता.पंतप्रधान मोदी २०१४ पासून प्रत्येक स्वातंत्र्य दिनी फेटा परिधान करुन देशवासींयाशी संवाद साधतात. २०१८ मध्ये मोदींनी केशरी रंगाचा फेटा, चुडीदार आणि पूर्ण बाह्यांचा कुर्ता घातला होता. तर २०१७ मध्ये पंतप्रधानांनी लाल आणि पिवळ्या रंगाचा फेटा परिधान केला होता. यावर सोनेरी रंगाच्या रेघादेखील होत्या. त्यावेळी मोदींनी बंद गळ्याचा कुर्ता घातला होता. २०१६ मध्ये मोदींनी गुलाबी आणि पिवळा रंगाचा फेटा परिधान करुन देशवासीयांना संबोधित केलं. त्यावेळी मोदींनी पांढऱ्या रंगाचा अर्ध्या बाह्याचा कुर्ता घातला होता. त्यावर हलक्या चौकटीदेखील दिसत होत्या. २०१५ मध्ये देशवासीयांना उद्देशून भाषण करताना मोदींनी पिवळ्या रंगाचा फेटा घातला होता. त्यावर काही लाल आणि गडद हिरव्या रंगाच्या चौकटीदेखील होत्या. २०१४ मध्ये पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा भाषण करताना मोदींनी जोधपुरी फेटा घातला होता.
Independence Day: ...अन् 'ती' परंपरा पंतप्रधान मोदींनी यंदाही पाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 11:58 AM