PM Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिल्लीतील विज्ञान भवनात CBIच्या स्थापना दिनाच्या हीरक महोत्सवी सोहळ्याचे उद्घाटन केले. यावेळी पीएम मोदींनी सीबीआयच्या कामाचे कौतुक केले. सीबीआयने न्यायाचा ब्रँड म्हणून आपला ठसा उमटवला आहे. सीबीआयच्या नावावर अनेक उपलब्धींची नोंद आहे. आता कुठेही काहीही घडलं की, प्रत्येकाच्या ओठावर सीबीआय चौकशीचे नाव येते. हीच एक मोठी उपलब्धी आहे, असे मोदी म्हणाले.
2014 पासून भ्रष्टाचारविरोधात मिशनकेंद्रीय गृह मंत्रालयाने 1 एप्रिल 1963 रोजी सीबीआयची स्थापना केली होती. आज सीबीआयची स्थापना होऊन 60 वर्षे पूर्ण होत आहेत. यावेळी पीएम मोदी पुढे म्हणतात, आज लोक सीबीआय तपासासाठी आंदोलन करतात. कोणत्याही प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी आजही होत असते. देशातील भ्रष्टाचार संपवण्यात सीबीआयची सर्वात मोठी भूमिका आहे. 2014 नंतर आमच्या सरकारने काळ्या पैशांबाबत भ्रष्टाचाराविरुद्ध मिशन सुरू केले.
भ्रष्टाचार हा सामान्य गुन्हा नाही भ्रष्टाचार हा लोकशाहीच्या मार्गातील मोठा अडथळा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, देशाला भ्रष्टाचारमुक्त करणे ही सीबीआयची जबाबदारी आहे. भ्रष्टाचार हा काही साधा गुन्हा नाही. यामुळे गरीब त्यांच्या हक्कापासून वंचित राहतात. गुन्ह्यांना जन्म होतो. या मार्गातील हा सर्वात मोठा अडथळा ठरतो. भ्रष्टाचारामुळे तरुणांना योग्य संधी मिळत नाही. भ्रष्टाचार हा प्रतिभेचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि येथूनच घराणेशाही आणि कुटुंबवादाला बळ मिळाले आहे, असेही मोदी म्हणाले.
सीबीआयची व्याप्ती मोठी काँग्रेस सरकारचे नाव न घेता पीएम मोदी म्हणाले की, गुलामगिरीच्या काळात लोक भ्रष्टाचाराला बळ देत राहिले. पूर्वी भ्रष्टाचार करण्याची स्पर्धा असायची. तुम्ही एवढा भ्रष्टाचार केलात तर मी एवढा भ्रष्टाचार करेन. त्यावेळी आरोपी मोकाट होते. यंत्रणा त्यांच्या पाठीशी आहे, हे त्यांना माहीत होते. यामुळे देशाच्या विश्वासाला तडा गेला. आता सीबीआयची व्याप्ती खूप मोठी झाली आहे. आजच्या काळात सीबीआयला महानगरापासून जंगलापर्यंत धाव घ्यावी लागते.
टपाल तिकिटे आणि नाणी जारी या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी टपाल तिकीट आणि नाणेही जारी केले. यासोबतच त्यांनी सीबीआयचे ट्विटर पेजही सुरू केले. या समारंभात पीएम मोदींनी सीबीआय अधिकाऱ्यांना पदक देऊन सन्मानितही केले. या अधिकाऱ्यांची विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये सीबीआयच्या सर्वोत्कृष्ट तपास अधिकारी म्हणून सुवर्णपदक जाहीर करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यावेळी पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर आणि मेघालयच्या शिलाँगमध्ये सीबीआयच्या नवीन कार्यालयांचे उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले.