नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. यावेळी निवडणुकीचे वर्ष पाहता तुम्ही सर्वांनी मेहनत करा, फक्त आगामी लोकसभा निवडणुकीकडे नुसते बघू नका, तर २०४७ च्या दिशेने काम करा, असे आवाहन पंतप्रधानांनी बैठकीत उपस्थित सर्व मंत्र्यांना केले. यासोबतच संसदेचे पावसाळी अधिवेशन जुन्या संसद भवनातच होणार असल्याचेही पंतप्रधान मोदींनी सांगितले.
याचबरोबर पायाभूत सुविधांच्या विकासावर आणि त्याचा परिणाम यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले. भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G-२० बैठकीपूर्वी प्रगती मैदानात बांधलेल्या नवीन कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली होती. नवी दिल्ली येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय समूहाच्या बैठकीत त्यांच्यासमोर मांडण्यात येणार्या मुद्द्यांवरही नरेंद्र मोदींनी सविस्तर चर्चा केली.
एका ट्विटमध्ये नरेंद्र मोदी म्हणाले की, ही बैठक सुमारे पाच तास चालली आणि 'सार्थक' झाली. कारण मंत्र्यांनी 'विविध धोरणात्मक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण केली.' तसेच, न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, नरेंद्र मोदींनी 'प्रेरणादायी भाषण' जवळपास २० मिनिटे केले. या बैठकीची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले की, "प्रत्येकजण सध्याच्या किंवा पुढच्या वर्षाबद्दल बोलत आहे, परंतु आमच्या सरकारने पुढील २५ वर्षांसाठी म्हणजे २०४७ पर्यंत एक दृष्टीकोन ठेवून काम केले पाहिजे."
नरेंद्र मोदी म्हणाले, "केवळ योजना सुरू करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे पुरेसे नाही. तर मंत्र्यांनी जिल्हा स्तरापासून राज्य आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याची खात्री केली पाहिजे." याशिवाय, नरेंद्र मोदी म्हणाले, या कार्यक्रमांबाबत पक्षाच्या खालच्या स्तरावरील कार्यकर्त्यांशी चर्चा झाली पाहिजे आणि नागरिकांशीही बोलले पाहिजे. भूतकाळातील इतर पक्ष आणि सरकारांप्रमाणे आपली टीम अदूरदर्शी नसावी, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी अधोरेखित केले.