नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागणाऱ्या केजरीवालांवर लोकपाल, बाटला हाऊस एन्काऊंटर आणि CAA विरोधात शाहीन बाग सुरू असलेल्या हिंसाचारावरून टीकास्त्र सोडलं आहे. देशाच्या सौहार्दाला खंडित करण्यासाठी ही सर्व कटकारस्थानं सुरू आहेत, असं मोदी म्हणाले आहेत. दिल्लीत मोदी सरकार येण्याआधी दहशतवादी हल्ले होत होते, परंतु ते आता थांबले आहेत. गुन्हेगारांना दिल्ली पोलिसांनी ठार केल्यावर ते बनावट एन्काऊंटर असल्याचा कांगावा करण्यात आला. शाहीन बागच्या मुद्द्यावरूनही मोदींनी काँग्रेस आणि आपवर हल्लाबोल केला आहे. शाहीन बाग हिंसाचार योगायोग नव्हे, तर कट असल्याचा आरोप मोदींनी केला आहे. तसेच दिल्लीच्या लोकांना विकासासाठी सुरक्षित वातावरण पाहिजे होतं. केजरीवालांनी गरिबांचा हक्क हिरावून घेतला आहे. दिल्लीतल्या लोकांनी परिवर्तनाचं मन बनवलं असून, सर्वच स्पष्ट दिसत आहे, असं म्हणत मोदींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी कडकडडुमामध्ये पोहोचले असून, त्यांनी एका रॅलीला संबोधित केलं आहे.
दिल्ली फक्त शहरच नसून त्याला वारसा लाभलेला आहे. दिल्लीनं नेहमीच सर्वांचा सत्कार केलेला असून, सगळ्यांनाच स्वीकारलेलं आहे. फाळणीनंतर आलेल्या किंवा इतर राज्यांतील भारतीयांना दिल्लीनं आपल्या हृदयात सामावून घेतलं आहे. दिल्लीतल्या सातही जागा आम्हाला देऊन दिल्लीचे लोक कोणत्या दिशेनं विचार करतात हे समजलं आहे.
भाजप नकारात्मकतेचं नव्हे तर सकारात्मकतेवर विश्वास ठेवते. देशासाठी आम्ही केलेले संकल्प मोठे आहेत. देशासमोरली शेकडो आव्हाने आम्ही सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. अवैध कॉलनींचा प्रश्न कोणीही सोडवला नव्हता. कोर्टात तारखांवर तारखा पडत होत्या. पण तो प्रश्न आम्ही सोडवून दाखवला.