नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विविध सरकारी विभागांमध्ये भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना ५१,००० नियुक्ती पत्रांचे वाटप केले. या रोजगार मेळाव्यात नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. देशभरात ४६ ठिकाणी या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. रोजगार मेळाव्यात सहभागी झालेल्या तरुणांना संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले, "२०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनवायचे आहे. भारतात तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. नवा भारत कमाल करत आहे."
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोजगार मेळाव्याअंतर्गत सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या सुमारे ५१,००० नियुक्ती पत्रांचे वाटप केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन कर्मचाऱ्यांना संबोधित करून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी सरकारी सेवांसाठी आज नियुक्ती पत्र मिळालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन. तुम्हा सर्वांनी अथक परिश्रमानंतर हे यश मिळवले आहे. लाखो उमेदवारांमधून तुमची निवड झाली आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
गेल्या ९ वर्षांत आमच्या योजनांनी आणखी मोठी उद्दिष्टे साध्य करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. आमची धोरणे नवीन मानसिकता, सामग्री निरीक्षण, मिशन मोड अंमलबजावणी आणि लोकसहभागावर आधारित आहेत. ९ वर्षात सरकारने मिशन मोडवर धोरणे लागू केली आहेत, असे नरेंद्र मोदींनी सांगितले. तसेच, ते म्हणाले, ''मित्रांनो, देशाच्या विकासाच्या प्रवासात तुम्हा सर्वांना थेट सरकारसोबत काम करण्याची संधी मिळत आहे. मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो, भारताचा संकल्प सार्थकी लावल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन."
याचबरोबर, गेल्या ९ वर्षांत नाविन्यपूर्ण पद्धतीने मोठे बदल झाले आहेत. तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने भ्रष्टाचार कमी होऊन सुविधा वाढल्या आहेत, असेही नरेंद्र मोदी म्हणाले. दरम्यान, यापूर्वी २८ ऑगस्ट रोजी ८ व्या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये नरेंद्र मोदींनी ५१ हजार १०६ तरुणांना नियुक्तीपत्रे दिली होती. या रोजगार मेळाव्यात नियुक्त करण्यात येणारे नवीन कर्मचारी टपाल विभाग, भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग, अणुऊर्जा विभाग, महसूल विभाग, उच्च शिक्षण विभाग, संरक्षण मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यासह विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये आपली सेवा देतील.