नवी दिल्ली - भाजपाचे ज्येष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांचे पुत्र आमदार आकाश विजयवर्गीय यांनी एका अधिकाऱ्याला बॅटने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने भाजपाची राष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाली होती. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, नेत्यांच्या अशा बेताल वागण्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशा नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे, असे वक्तव्य मोदींनी भाजपाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत केले.
यासंदर्भातील वृत्त टाइम्स नाऊ वृत्तवाहिनीने प्रसारित केले आहे. भाजपाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत नरेंद्र मोदींनी गैरवर्तन करणाऱ्या नेत्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. असे वर्तन खपवून घेतले जाऊ शकत नाही. अशा व्यक्तींना पक्षातून बाहेरची वाट दाखवली गेली पाहिजे. असे गैरवर्तन करणारी व्यक्ती भलेही कुणाचे पुत्र असले तरी त्यांना मनमानी करण्याची परवानगी देता येणार नाही, असे मोदींनी सांगितले.
आपल्या संपूर्ण वक्तव्यामध्ये मोदींनी आकाश विजयवर्गीय यांचा नामोल्लेख टाळला असला तरी त्यांचा रोख स्पष्टपणे त्यांच्याकडेच होता. दरम्यान, आकाश विजयवर्गीय यांनी अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीबाबत आपल्याला पश्चाताप होत नसल्याचे सोमवारी म्हटले होते. तसेच यापुढे महात्मा गांधींनी घालून दिलेल्या अहिंसेच्या मार्गानं चालण्याचा प्रयत्न करणार असल्याचेदेखील विजयवर्गीय यांनी सांगितले होते. इंदूर महापालिकेच्या अधिकाऱ्याला बॅटनं मारहाण केल्या प्रकरणी आकाश यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. न्यायालयानं शनिवारी त्यांच्या सुटकेचे आदेश दिले होते.
आकाश यांच्या सुटकेवेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. आकाश यांना जामीन मिळाल्यावर त्यांच्या समर्थकांनी हवेत गोळीबार करुन आनंद साजरा केला होता. विशेष म्हणजे इंदूरमधील भाजपा कार्यालयासमोर हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला होता. यामध्ये गोळीबार करणाऱ्या कार्यकर्त्यासमोर विजयवर्गीय यांचे समर्थक भाजपाचा झेंडा घेऊन नाचताना दिसत होते. याशिवाय काहीजण रस्त्यावर फटाक्यांची माळ पेटवत होते. तुरुंगात वेळ चांगला गेल्याची प्रतिक्रिया त्यांनी सुटकेनंतर दिली.