नवी दिल्ली - नववर्षाचे मोठ्या दणक्यात स्वागत करण्यात आले आहे. सरत्या वर्षाला निरोप देत उत्साहात 2020 चे स्वागत झाले. जगभरात नववर्षाचा उत्साह पाहायला मिळाला. मुंबई, गोवा, दिल्ली या शहरांसह देशामध्ये अनेक ठिकाणी आकर्षक रोषणाई आणि आतषबाजी करत नववर्षाचे दणक्यात स्वागत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देशभरातील लोकांनीही ट्विटरवरून मोदींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान मोदींनी आपल्या एका चाहत्याला नववर्षाची खास भेट दिली आहे. नववर्षाच्या निमित्ताने मोदींच्या एका चाहत्याने ट्विटरवरून एक इच्छा व्यक्त केली होती. अंकित दुबे असं या ट्विटर युजरचं नाव आहे. अंकितने आपण पंतप्रधानांचे चाहते आहोत आणि त्यांच्याकडून आपल्याला नवीन वर्षाची मिळेल का? असं ट्विट केलं होतं. पंतप्रधान मोदींनी अंकितची ही इच्छा पूर्ण करून त्याला सुखद धक्का दिला आहे.
'आदरणीय पंतप्रधान, मी तुमचा मोठा चाहता आहे. मला नववर्षाची तुमच्याकडून एक भेट मिळेल का? मी तुम्हाला फॉलो करतो. तुम्ही मला Twitter वर फॉलो बॅक कराल का?' असं ट्विट अंकितने केलं होतं. नरेंद्र मोदी यांनी त्याला फॉलो करत नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत नववर्षाची खास भेट दिली आहे. पंतप्रधान मोदींनी उत्तम काम करणाऱ्या तसेच संकल्प पुढे नेणाऱ्या काही लोकांचं ट्विट रिट्विट केलं आहे. अंबिकापूर येथील शाळेच्या विद्यार्थ्यांचं ट्वीट त्यांनी याच प्रकारे शेअर केलं. तसेच प्लास्टिक वापर बंदीच्या उपक्रमाला पुढे नेणाऱ्या अनेकांचं मोदींनी कौतुक केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. '2020 च्या हार्दिक शुभेच्छा! नववर्षात सर्वांना सुख-समृद्धी, सदृढ आरोग्य लाभो', अशा शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत. मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून बुधवारी (1 जानेवारी) हे ट्विट केलं. तसेच नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सरत्या वर्षाला निरोप देत त्यांनी 2020 हे वर्ष देशवासियांच्या जीवनात आनंद घेऊन येईल अशी प्रार्थना केली आहे. '2020 हे वर्ष भारताला बदलण्यासाठी लोकांना सशक्त करेल आणि प्रत्येक देशवासी सक्षम, सबळ होईल अशी आशा करूया' असं ट्विट करण्यात आले आहे. मोदींनी NaMo 2.0 या ट्विटर हँडलने केलेल्या एका ट्विटच्या उत्तरादाखल हे ट्विट केले आहे.