निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. देशात सात टप्प्यांत निवडणूक होणार असून चार जूनला निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
"लोकशाहीचा सर्वात मोठा सण आला आहे. EC ने 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. आम्ही, भाजपा-एनडीए, निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहोत" असं मोदींनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "दहा वर्षांपूर्वी आम्ही सत्तेवर येण्याआधी, इंडिया आघाडीच्या दयनीय कारभारामुळे भारतातील जनतेला फसवणूक आणि निराश वाटू लागले होते. जगाने भारताची साथ सोडून दिली होती. तिथून आता हे एक अद्भुत परिवर्तन झालं आहे."
"140 कोटी भारतीयांच्या शक्तीमुळे आपला देश विकासाचे नवनवीन रेकॉर्ड करत आहे. आपण जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालो आहोत, करोडो लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. आमच्या योजना भारताच्या सर्व भागात पोहोचल्या आहेत आणि त्यांचे चांगले परिणाम दिसून आले आहेत."
"एक मजबूत, केंद्रित सरकार काय करू शकते हे भारतातील लोक पाहत आहेत, भारताच्या कानाकोपऱ्यातून, समाजातील प्रत्येक घटकातील लोक एकाच आवाजात म्हणत आहेत, अब की बार, 400 पार!"
"आमच्या तिसऱ्या कार्यकाळात बरीच कामे करायची आहेत. सत्तर वर्षे राज्य करणाऱ्यांनी निर्माण केलेलr पोकळी भरून काढण्याचं मागचं दशक होतं. होय भारत समृद्ध आणि स्वावलंबी होऊ शकतो असा आत्मविश्वास निर्माण करण्याबाबतही ते होतं. या भावनेला आपण पुढे नेऊ."
"गरिबी आणि भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई आणखी वेगाने सुरू होईल. सामाजिक न्यायवर भर दिला जाईल. आम्ही भारताला तिसरी सर्वात मोठी जागतिक अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने काम करणार आहोत. तरुणांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही आमचे प्रयत्न आणखी मजबूत करू."
"मला माझ्या देशवासीयांच्या आशीर्वादाने, विशेषत: गरीब, शेतकरी, तरुण आणि नारीशक्तीच्या आशीर्वादाने खूप शक्ती मिळते. जेव्हा माझे देशवासी म्हणतात – 'मैं हूँ मोदी का परिवार', तेव्हा ते मला विकसित भारताच्या उभारणीसाठी कठोर परिश्रम करण्यास प्रोत्साहित करतात. विकसित भारतासाठी आपण सामूहिक प्रयत्न करू आणि हे लक्ष्य साध्य करू. 'यही समय है, सही समय है'" असं देखील मोदींनी म्हटलं आहे.