नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रक्षाबंधनाचा सण साजरा केला. काल मोदींनी ट्विटरवर क्रीडा आणि माध्यम जगतातील 55 महिलांना ट्विटर फॉलो केलं. यामध्ये बॅडमिंटनपटू अश्विनी पोनप्पा, टेनिसपटू सानिया मिर्झा, कर्मन कौर थंडी यांचा समावेश आहे. याशिवाय माजी धावपटू पी. टी. उषा, माजी मिस इंडिया आणि बाल अधिकार कार्यकर्त्या स्वरुप, पत्रकार रोमामा इसार खान, श्वेता सिंह, शीला भट्ट आणि शालिनी सिंह यांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर अभिनेत्री कोयना मित्रा, भारत्तोलनपटू कर्णम मल्लेश्वरी, फोटो जर्नलिस्ट रेणुका पुरी यांच्यासह भाजपाच्या काही सदस्या आणि राज्य सरकारमधील मंत्र्यांना फॉलो केलं आहे. मोदींनी ट्विटरवर फॉलो केल्यानं काही महिलांनी मोदींचे आभार मानले आणि त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. मोदींनी रक्षाबंधनाच्या निमित्तानं महिलांना ट्विटरवर फॉलो केल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली. मोदी त्यांच्या वैयक्तिक ट्विटर हॅन्डलवरुन 2 हजार लोकांना फॉलो करतात. तर मोदींना फॉलो करणाऱ्यांची संख्या 4.37 कोटी इतकी आहे. पंतप्रधान मोदी यांचं अधिकृत ट्विटर हॅन्डल असलेल्या पीएमओ इंडियाला 2.69 कोटी लोक फॉलो करतात. तर पीएमओ इंडिया 438 लोकांना फॉलो करतं. यामध्ये जगातील दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. मोदींनी काल देशवासीयांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. 'रक्षाबंधनाचा सण बहिण आणि भावाच्या प्रेमाचं आणि त्यांच्या एकमेकावरील विश्वासाचं प्रतीक आहे,' असं ट्विट मोदींनी केलं होतं.
Raksha Bandhan 2018: रक्षाबंधनादिवशी पंतप्रधान मोदींनी 55 महिलांना ट्विटरवर केलं फॉलो
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 9:19 AM