हे ज्यांचं वाईट चिंततील, त्यांचं भलंच झालंय; PM मोदींची जोरदार बॅटिंग, तीन उदाहरणंच दिली!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 06:08 PM2023-08-10T18:08:49+5:302023-08-10T18:10:10+5:30
Parliament No-confidence Motion: जगभरात भारताचं नाव उंचावलं असून देशात परदेशी गुंतवणूक देखील वाढत असल्याचं नरेंद्र मोदींनी सांगितले.
नवी दिल्ली: लोकसभेत आज काँग्रेसने आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले. देशाच्या जनतेने आमच्या सरकारवर वारंवार जो विश्वास दाखवला आहे, देशाच्या कोट्यवधी जनतेचे आभार, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरुवात केली. आम्ही जेव्हा जनतेचा कौल मागितला, तेव्हा जनतेनेही पूर्ण ताकदीने यांच्यासाठी अविश्वास घोषित केला. एनडीएला आणि भाजपाला जास्त जागा मिळाल्या. त्यामुळे एक प्रकारे विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ असतो. तुम्ही पक्क केलं आहे की एनडीए आणि भाजपा २०२४च्या निवडणुकीत जुने सर्व विक्रम तोडून जनतेच्या आशीर्वादाने विजयी होतील, असा दावाही नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला.
पाच वर्षांत साडे तेरा कोटी लोक गरिबीतून बाहेर आल्याची माहिती देखील नरेंद्र मोदींनी दिली. देशाचं जे मंगल होतंय, जयजयकार होतोय. दिवसरात्र हे मला बोलतच असतात. मोदी तेरी कब्र खुदेगी, हा यांचा आवडता नारा आहे. पण माझ्यासाठी यांचे हे अपशब्द टॉनिक आहे. हे असं का करतात, याचं सिक्रेट मी सांगू इच्छितो की, माझा ठाम विश्वास झाला आहे. विरोधी लोकांना एक सिक्रेट वरदान मिळालं आहे, ते म्हणजे, ज्यांचं वाईट चिंततील, त्यांचं भलंच होईल. एक उदाहरण माझ्या रुपाने आहेच, २० वर्षं झाली, काय-काय केलं गेलं...पण माझं भलंच झालं, असा टोला नरेंद्र मोदींनी विरोधकांना लगावला.
जगाचा भारतावरचा विश्वास वाढत असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले. तर जगभरात भारताचं नाव उंचावलं असून देशात परदेशी गुंतवणूक देखील वाढत असल्याचं नरेंद्र मोदींनी सांगितले. जगाचा भारतावरचा विश्वास वाढत चालला आहे. इतकं आश्वासक वातावरण असताना, अविश्वास प्रस्तावाच्या माध्यमातून जनतेचा आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न विरोधक करत असल्याचा आरोप नरेंद्र मोदींनी केला. तसेच हे लोक देशाच्या ज्या संस्थां रसातळाला जाण्याचे दावे करतात, त्या संस्थांचं भाग्य उजळून निघतं. हे लोक ज्या पद्धतीने देशाबद्दल बोलत आहेत, मला विश्वास आहे की देशाचंही भलंच होणार आहे, असं सांगत नरेंद्र मोदींनी तीन उदाहरणे दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली ३ उदाहरणे-
१. बँकिंग क्षेत्र उद्ध्वस्त होऊन जाईल. मोठमोठ्या तज्ज्ञांना विदेशातून आणून त्यांच्याकडून हे बोलून घेत होते. पण आपल्या सार्वजनिक बँकांचा निव्वळ नफा दुप्पट झाला. त्यांनी फोन बँकिंग घोटाळ्याचा उल्लेख केला. पण एनपीए पूर्ण कमी करून नव्या दिशेनं वाटचाल सुरू केलं आहे.
२. एचएएलवर बऱ्याच वाईट गोष्टी हे बोलले. एचएएल उद्ध्वस्त झालंय असं सांगितलं गेलं. आजकाल शेतांमध्ये जाऊन व्हिडीओ शूट केले जातात. तसेच त्या वेळी एचएएल कंपनीच्या दरवाज्यावर कामगारांची सभा घेऊन व्हिडीओ शूट केला होता. कामगारांना भडकवण्यात आलं होतं. पण आज HAL यशस्वी आहे.
३. एलआयसीबाबतही असेच दावे केले गेले. पण आज एलआयसी सातत्याने मजबूत होत आहे. शेअर मार्केटमध्ये रस असणाऱ्यांना हा गुरुमंत्र आहे. ज्या सरकारी कंपनीवर विरोधक आरोप करतील, त्यात तुम्ही गुंतवणूक करून टाका, असा टोला देखील नरेंद्र मोदींनी लगावला.
#WATCH | Hindustan Aeronautics Limited (HAL) recorded its highest-ever revenue. Despite their (opposition's) allegations, HAL has emerged as the pride of the country. They said many things about LIC that the money of the poor will sink but today LIC is getting stronger. 'Share… pic.twitter.com/dH2eOoGuk9
— ANI (@ANI) August 10, 2023