नवी दिल्ली - केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात सध्या दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने शेतकरीविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप करत विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना एमएसपीची हमी देत एमएसपी होती, आहे आणि कायम राहील, असे सांगितले होते. त्यावर आता भारतीय किसान युनियनचे सचिव राकेश टिकैत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राकेश टिकेत एमएसपीबाबत म्हणाले की, आम्ही कुठे म्हटले आहे की, एमएसपी संपुष्टात येणार आहे. आमची मागणी एमएसपीबाबत कायदा करावा अशी आहे. जर असा कायदा झाला तर संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सध्या एमएसपीबाबत कुठलाही कायदा नाही आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होत आहे.
तसेच एकदा सुधारणा करून लाभ होतोय का नाही हे पाहायला हवं, त्रुटी असेल ती दुरुस्त करूया.. यामुळे बाजारपेठ आधुनिक होईल, स्पर्धा वाढेल त्याचसोबत एमएसपी आहे, राहील आणि यापुढे राहणार आहे, त्यामुळे भ्रम पसरवू नका, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दुसऱ्या पर्यायावर भर देणं गरजेचे आहे. शेतकऱ्यांवरील बोझा कमी व्हावा यासाठी विचार केला पाहिजे. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी, नफा वाढविण्यासाठी आपणास आणखी काम करायचं आहे. राजकारण करुन शेतकऱ्यांना काळोखात ढकलू नये असं नरेंद्र मोदींनी सांगितले.