मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील २१ दिवस देशभरात लॉकडाऊन करण्यात येत असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. स्वत:ला वाचवण्यासाठी, कुटुंबीयांना वाचवण्यासाठी आणि देशाला वाचवण्यासाठी पुढील २१ दिवस घरात राहा. बाहेर पडू नका, असं कळकळीचं आवाहन त्यांनी केलं. परिस्थिती अतिशय आव्हानात्मक आहे. या परिस्थितीत संपूर्ण देश एक म्हणून उभा आहे. २१ दिवसांचा कालावधी मोठा आहे. मात्र आपण निश्चितपणे कोरोनावर विजय मिळवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोरोनाची लक्षणं दिसायला लागणारा कालावधी आणि कोरोनाचा विषाणू संक्रमित होण्याचा वेग या संदर्भातील काही आकडेवारी पंतप्रधान मोदींनी दिली. 'जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची लक्षणं दिसायला काही दिवसांचा कालावधी जातो. त्या दिवसांमध्ये कोरोनाबाधित व्यक्तीनं अनेकांना संक्रमित केलेलं असतं. कोरोनाची बाधा झालेली एक व्यक्ती एवघ्या आठवड्याभरात शेकडो लोकांपर्यंत विषाणू पसरवते,' असं मोदींनी सांगितलं.कोरोनाबाधितांची संख्या किती झपाट्यानं वाढते, याची माहितीदेखील मोदींनी दिली. 'जगात कोरोना संक्रमितांची संख्या १ लाखावर जायला ६७ दिवस लागले होते. मात्र हीच संख्या १ ते २ लाखांवरुन अवघ्या ११ दिवसांत पोहोचली. यानंतरचे एक लाख रुग्ण आढळून येण्यासाठी, म्हणजेच रुग्णांची संख्या २ लाखांवरुन ३ लाखांवर जायला केवळ ४ दिवसांचा कालावधी लागला. यातून कोरोना किती वेगानं फोफावतोय, याची कल्पना करा,' अशा शब्दांत मोदींनी देशवासीयांना पुढील २१ दिवस घरातच राहण्याचं आवाहन केलं