President Draupadi Murmu: भारत देशाच्या इतिहासात एक अतिशय मोठी घटना घडली. आदिवासी घटकातील महिला द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या सर्वोच्च पदी राष्ट्रपती म्हणून विराजमान होण्याचा मान मिळवला. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांनी विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार असलेले यशवंत सिन्हा यांना पराभूत केले. द्रौपदी मुर्मू यांना ८१२ तर यशवंत सिन्हा यांना ५२१ मते मिळाली. मुर्म यांच्या विजयाची घोषणा झाल्यावर अवघ्या काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा दोघेही स्वत: मुर्मू यांच्या निवासस्थानी दाखल झाले आणि त्यांनी मुर्मू यांना शुभेच्छा दिल्या. पाहा व्हिडीओ-
--
देशात आज पहिल्यांदाच एक आदिवासी महिला राष्ट्रपती पदावर विराजमान झाली. द्रौपदी मुर्मू २४ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. देशाचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपुष्टात येत आहे. त्यानंतर त्या पदभार स्वीकारतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही ट्वीट करत मुर्मू यांचे अभिनंदन केले. तसेच, विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनीही मोठ्या मनाने मुर्मू यांचे अभिनंदन केले.
दरम्यान, एनडीएने राष्ट्रपतीपदासाठी आदिवासी महिलेचा चेहरा देत साऱ्यांनाच धक्का दिला होता. देशातील आदिवासी समाजाचा सन्मान म्हणून विरोधकांमधील काही पक्षांनीही मुर्मू यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे भाजपाची खेळी यशस्वी ठरली. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यातच मुर्मू यांनी आघाडी घेतली होती. तीच आघाडी शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यात त्यांना यश आले. अखेर विजयावर शिक्कामोर्तब करत मुर्मू यांची विजयाची आघाडी एकूण ८१२ मतांपर्यंत पोहोचली. तर यशवंत सिन्हा यांना ५२१ मतं पडली. तिन्ही फेरीत एकूण मिळून द्रौपदी मुर्मू यांना २,१६१ मतं मिळाली आणि त्यांचा विजय झाला.