नवी दिल्ली - जम्मू काश्मीर मुद्द्यावरुन भारत-पाक यांच्यातील संबंध ताणले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरुन चर्चा केली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास ३० मिनिटे चर्चा झाली. त्यात द्विपक्षीय संबंध आणि सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली.
या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचं नाव न घेता देशात दहशतवाद पसरविण्यात येत असल्याचा आरोप केला. काही नेत्यांच्या वक्तव्यातून भारताच्या विरोधात विधानं सुरु आहेत. ते आशिया खंडातील देशांच्या शांततेसाठी चांगले नाही. या चर्चेत त्यांनी दहशत आणि हिंसामुक्त वातावरण निर्माण करण्यावर जोर दिला. शांततेचं वातावरण कायम ठेवण्यासाठी दहशतवादाला थारा दिला जाऊ नये असं मोदींनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी काश्मीर प्रश्नावर अमेरिकेनं त्यांची भूमिका पूर्णपणे स्पष्ट केली आहे. काश्मीर हा भारत-पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय प्रश्न आहे. त्यामुळे अमेरिका यामध्ये मध्यस्थी करणार नसल्याची भूमिका ट्रम्प प्रशासनानं घेतली. यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेच्या माध्यमातून भारतावर दबाव आणण्याची पाकिस्तानची खेळी होती. मात्र ती पूर्णपणे अपयशी ठरली.
अमेरिका त्यांच्या जुन्या धोरणानुसार वाटचाल करणार असल्याची माहिती अमेरिकेतील भारताचे राजदूत हर्षवर्धन सिंगला यांनी दिली. भारत आणि पाकिस्ताननं एकत्र येऊन काश्मीर प्रश्न सोडवावा, अशी भूमिका अमेरिकेनं घेतली आहे. याआधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे पाकिस्तानच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र काश्मीर प्रश्न द्विपक्षीय असल्याची स्पष्ट भूमिका भारतानं ट्रम्प प्रशासनाकडे मांडली. यामुळे आता ट्रम्प यांनी घूमजाव करत मध्यस्थी करण्यास नकार दिला.
तसेच भारतानं कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान भारताविरोधात आक्रमक झाला असून, पाकिस्तानने बुधवारी (7 ऑगस्ट) भारतासोबतचे द्विपक्षीय व्यापारी संबंध तोडले आहेत. याशिवाय भारतासोबतचे मुत्सद्दी संबंध सुद्धा डाऊनग्रेड केले आहेत. त्यानंतर आता अमेरिकेनंही त्यांना इशारा दिला आहे. पाकिस्ताननं भारताविरोधात आक्रमक होण्याऐवजी दहशतवादावर कारवाई करावी, असे खडे बोल पाकिस्तानला सुनावले होते. त्याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी केलेला संवाद महत्वपूर्ण आहे.