नवी दिल्ली: अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर देशाला पहिले स्वदेशी अटॅक हेलिकॉप्टर 'लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर'(Light Combat Helicopter) मिळणार आहे. उद्या म्हणजेच 19 नोव्हेंबरला राणी लक्ष्मीबाई जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः हवाई दलाला लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर सुपूर्द करतील. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत संरक्षण मंत्रालय 17-19 नोव्हेंबर दरम्यान झाशी येथे राष्ट्रीय संरक्षण आत्मसमर्पण पर्व साजरे करणार आहे. याच अंतर्गत झाशीमध्ये देशाच्या सशस्त्र दलांचे अनेक प्रगतीशील कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.
प्रकल्पाला 2006 मध्ये मंजुरी मिळाली होती
कारगिल युद्धापासून भारताने एलसीएच स्वदेशी अटॅक हेलिकॉप्टर तयार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळेस भारताकडे 15-16 हजार फूट उंचीवर जाऊन शत्रूचे बंकर नष्ट करण्यास सक्षम अटॅक हेलिकॉप्टर नव्हते. यानंतर भारतात हे हेलिकॉप्टर तयार करण्यासाठी2006 साली मंजुरी मिळाली. गेल्या 15 वर्षांच्या मेहनतीनंतर आता हे लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर तयार करण्यात आले आहे.
अमेरिकन हेलॉकॉप्टर यापुढे फेलभारताने नुकतेच अमेरिकेकडून अॅटॅक हेलिकॉप्टर अपाचे विकत घेतले आहे, परंतु अपाचेदेखील कारगिल आणि सियाचीनच्या शिखरांवर उतरू शकत नाही. परंतु अत्यंत हलके असल्यामुळे आणि विशेष रोटर्स असल्यामुळे, LCH इतक्या उंच शिखरांवरही आपली मोहीम पार पाडू शकते.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने तयारी केली
LCH हे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड(HAL) द्वारे तयार केले गेले आहे, जे भारताच्या संरक्षण क्षेत्रातील सर्वात मोठे आणि सर्वात विश्वसनीय युनिट आहे. काही दिवसांपूर्वीच याची चाचणी घेण्यात आली होती, त्यात या हेलिकॉप्टरला आकाशातून जमिनीवरचे लक्ष्य नष्ट करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. या यशस्वी चाचणीनंतर आता अखेर हे हेलिकॉप्टर भारतीय सैन्यात सामील होण्यास तयार झाले आहे.
ही आहेत LCH ची वैशिष्ट्ये
- लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर म्हणजेच एलसीएच हेलिकॉप्टरचे वजन सुमारे 6 टन आहे, तर अपाचेचे वजन सुमारे 10 टन आहे.
- कमी वजनामुळे हे आपल्या क्षेपणास्त्र आणि इतर शस्त्रांसह उंच भागात टेकऑफ आणि लँडिंग करू शकते.
- एलसीएच अटॅक हेलिकॉप्टरवर हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्रे वाहून नेले जाऊ शकते.
- एलसीएचमध्ये प्रत्येकी 70 मिमीच्या 12-12 रॉकेटचे दोन पॉड आहेत. याशिवाय, एलसीएचमध्ये 20 मिमीची बंदूक बसवण्यात आली आहे, जी 110 अंशात कोणत्याही दिशेने फिरू शकते.
- हेलिकॉप्टरची पूर्ण बॉडी बुलेटप्रुफ असून, गोळीबाराचा कोणताही विशेष परिणाम यावर होणार नाही. भारतीय हवाई दलासाठी पूर्णपणे तयार होण्यापूर्वी या स्वदेशी एलसीएच हेलिकॉप्टरची चाचणी सियाचीन ग्लेशियरपासून राजस्थानच्या वाळवंटापर्यंत करण्यात आली आहे.